पुणे : रस्त्यापेक्षा पदपथच मोठा ! मेट्रो स्थानकाखाली महापालिका प्रशासनाचा प्रताप
पुणे : आरटीओ कार्यालयासमोर असलेल्या मंगळवार पेठ मेट्रो स्थानकाखाली प्रशासनाने रस्त्यापेक्षा पदपथच मोठे केले आहे. त्यामुळे येथे संगम ब्रिजकडे येणार्या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असून, ऐन गर्दीच्या वेळी रुबी हॉल क्लिनिकपासून आरटीओ चौकापर्यंत रांगा लागत आहेत. महामेट्रो प्रशासनाच्या वतीने शहरात महत्त्वाच्या रस्त्यांवर नियोजनानुसार मेट्रोची स्थानके उभारण्यात आली आहेत.
आरटीओ चौकातसुध्दा मेट्रोचे स्थानक उभारण्यात आले आहे. मात्र, मेट्रो प्रशासनाने या स्थानकाखाली असलेल्या पदपथाची लांबी आणि रुंदी प्रमाणापेक्षा मोठी ठेवली आहे. त्यामुळे येथून जाणार्या राजा बहाद्दूर मिल रस्त्यावर दिवसभर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. यातून मार्ग काढताना वाहनचालकांच्या नाकी नऊ येत आहे. तसेच, येथील कोंडी सोडविता सोडविता वाहतूक पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे येथील पदपथांची लांबी कमी करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
आरटीओ चौकात विनाकारण अडचण…
महापालिका प्रशासनाने 'जी-20'साठी आरटीओ चौकात सुशोभीकरण केले. त्यासाठी प्रशासनाने येथे प्रमाणापेक्षा मोठा त्रिकोणी पदपथ आणि एक पुतळा उभारला आहे. यामुळे येथे वाहतुकीस मोठा अडथळा येत असून, कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने ते हटवावे, अशी मागणी होत आहे.
मला कोरेगाव पार्क येथे दररोज कामासाठी ये-जा करावी लागते. त्या वेळी संगम ब्रिजकडून रुबी हॉल रुग्णालयाकडे जाताना वाहतूक कोंडी लागत नाही. मात्र, याच रस्त्याने संगम ब्रिजकडे येताना मेट्रो स्थानकाखाली असलेल्या पदपथामुळे दररोज कोंडीचा सामना करावा लागतो. या पदपथाची लांबी कमी करावी.
– आनंद पाठक, वाहनचालक

