

पुणे: यंदा नवीन शैक्षणिक वर्षात शाळेची घंटा नेमकी कधी वाजणार? याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे. त्यानुसार नवीन शालेय शिक्षणाचा श्रीगणेशा 16 जूनपासून होणार आहे. 2 मे ते 15 जूनदरम्यान विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. विदर्भातील शाळा 23 ते 28 जूनदरम्यान सकाळी भरणार असून, 30 जूनपासून नियमित वेळेत शाळा सुरू होणार आहेत.
राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुटीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2025 ची उन्हाळी सुटी व शैक्षणिक वर्ष 2025-26 सुरू करण्यासंदर्भातील निर्देश प्राथमिकचे संचालक शरद गोसावी आणि माध्यमिकचे संचालक डॉ. श्रीराम पानझाडे यांनी दिले आहेत. (Latest Pune News)
प्राथमिक आणि माध्यमिकच्या संचालकांनी दिलेल्या निर्देशानुसार, राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शुक्रवार दि. 2 मेपासून सुटी जाहीर करण्यात येत आहे. राज्यातील इतर मंडळांच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास किंवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास प्रशासनाने सुटीचा त्यांच्या स्तरावर योग्य तो निर्णय घ्यावा.
पुढील शैक्षणिक वर्ष सन 2025-26 मध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागांतील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार, दि.16 जून रोजी सुरू करणे गरजेचे आहे. जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुटीनंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार दि. 23 ते 28 जूनपर्यंत सकाळच्या सत्रात 7 ते 11.45 या वेळेत सुरू करण्यात याव्यात. तसेच, सोमवार, दि. 30 जूनपासून नियमित वेळेत सुरू करण्यात याव्यात.
विभागीय उपसंचालक, प्राथमिक आणि माध्यमिकचे शिक्षणाधिकारी तसेच शिक्षण निरीक्षक यांनी संबंधित सूचना सर्व मान्यताप्राप्त राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या निदर्शनास आणून द्याव्यात, असे देखील दोन्ही संचालकांनी स्पष्ट केले आहे.
यंदा विद्यार्थ्यांच्या सुटीवर विरजण...
विद्यार्थ्यांना यंदा उन्हाळी सुट्यांचा जास्त आनंद घेता येणार नाही. कारण, वार्षिक परीक्षेचा 1 मे रोजी निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर 2 मेपासून विद्यार्थ्यांना निपुण महाराष्ट्र अॅपच्या माध्यमातून ऑनलाइन व ऑफलाइन वर्गामध्ये सहभागी होण्याचे शालेय शिक्षण विभागाने निर्देश दिले आहेत. यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचा मोबाईक क्रमांक अॅपमध्ये नोंदवून त्यांच्या साहाय्याने ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने वर्ग घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.