‘उजनी’वर भरू लागली परदेशी पाहुण्यांची शाळा !

‘उजनी’वर भरू लागली परदेशी पाहुण्यांची शाळा !
Published on
Updated on

पळसदेव : पुढारी वृत्तसेवा : उजनी धरणावर उशिरा का होईना परदेशी पक्ष्यांचे आगमन सुरू झाले आहे. गेल्या आठवड्यात समुद्र पक्षी (सी गल्स), चक्रवाक बदक (रूढी शेल्डक), परी बदक (नॉर्दर्न शॉवलर), सोनुला बदक (कॉमन टील), शेंद्री बाड्डा (पोचार्ड), मत्स्यघार (ऑस्प्रे) इत्यादी मत्स्याहारी पक्षी येऊन दाखल झाले आहेत. उजनीतील पाण्यामुळे आज 30 ते 40 हजार मच्छिमारांचा उदरनिर्वाह चालतो. मुबलक माशांचे खाद्य तसेच विपुल जलसाठ्यामुळे निर्माण झालेले आल्हाददायक वातावरणाचा लाभ घेण्यासाठी अनेक वर्षांपासून शेकडो प्रकारचे देशी- विदेशी पक्षी उजनी धरण परिसरात येत असतात. धरण परिसर पक्ष्यांचे आश्रयस्थान म्हणून नावारूपाला आले आहे.

यंदा परतीचा पाऊस जोरदार बरसल्याने उजनी धरण काठोकाठ भरलेले आहे. स्थलांतरित पक्ष्यांचा चराऊ भाग पाण्याने आच्छादित झाल्याने व वातावरणातील अस्थिरतेमुळे नेहमी वेळेवर येणारे स्थलांतरित पक्षी यावर्षी उशिराने आगमन करत आहेत. चिखलात लांब चिमट्यासारखी चोच खुपसून जलकृमींना लक्ष्य करणारे टिलवा (स्टिंट), तुतुवार (सँड पाइपर), पाणटिवळा (गॉडविट) इत्यादी 'वेडर पक्ष्यांनी हजेरी लावली आहे. जलाशय परिसरातील उघड्या भूभागावरील गवताळ प्रदेशात विविध ससाणे (फाल्कन), भोवत्या (हॅरिअर), ठिपक्यांचा गरूड (स्पॉटेड ईगल), मधुबाज (हनी बझर्ड) इत्यादी शिकारी पक्षीही दाखल झाले आहेत.

देखण्या रोहितांच्या आगमनाची प्रतीक्षा !

उजनी परिसरात येणार्‍या स्थलांतरित पक्ष्यांपैकी रोहित अर्थात फ्लेमिंगो हा नजाकतदार पक्षी पर्यटकांना नेहमी मोहात टाकत असतो. हे पक्षी दरवर्षी उजनीच्या पाणलोट क्षेत्रात शेकडोच्या समूहाने येऊन पुढच्या तीन-चार महिन्यांसाठी वास्तव्याला राहतात. यावर्षी ऋतुचक्रात बिघाड झाल्यामुळे या पक्ष्यांनी आपला प्रवास लांबणीवर टाकला असून अद्यापही पक्षीप्रेमींना त्यांच्या दर्शनाचा लाभ घेता आलेला नाही.

उजनी काठावर पक्ष्यांचा वावर सध्या तरी अत्यल्प प्रमाणात आहे; मात्र मत्स्याहारी बदके व शिकारी पक्ष्यांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. पुढील काही दिवसांत धरणातील पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर जलाशयाच्या काठावर दलदल व चिखलयुक्त परिसर तयार होईल; दरम्यानच्या काळात जिल्ह्यातील पाणवठेही कोरडे पडतील. अशावेळी जानेवारी व फेब—ुवारीदरम्यान उजनी धरण परिसर विविध पक्ष्यांच्या गर्दीने फुलून जाईल.
                                        डॉ. अरविंद कुंभार,  ज्येष्ठ पक्षी व पर्यावरण अभ्यास

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news