देहूरोड : व्याख्या दुसर्याकडून घेतलेली उधारी असते, तर अनुभव हा स्वतःचा ठेवा आहे. तसेच, विचार करून जो बोलतो तो पंडित व जो केलेल्या कामानंतर बोलतो तो प्रेमळ माणूस, असे सांगत मोरारीबापू यांनी व्याख्या आणि अनुभव यांचे सूत्र सोप्या शब्दात भाविकांना समजून सांगितले. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे आयोजित आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू निमंत्रित देहूनगरीत रामकथेत संत मोरारी बापू बोलत होते. मोरारी बापू यांनी अभंग प्रीतीचा अर्थ समजून सांगितला. मोरारी बापू म्हणाले, की प्रीती अभंग होऊ दे म्हणजेच तुझ्यावरील प्रेम थोडेही कमी होऊ देऊ नकोस. शास्त्रामध्ये प्रीतीचा अर्थ फार चांगला दिलेला आहे.
चार अवतारातून पाचव्या अवताराकडे जाते तेव्हा प्रीती पूर्ण होते. त्यामध्ये पहिला अवतार ईश्वर अवतार, दुसरा अवतार देव अवतार, तिसरा आचार्य अवतार आणि चौथा सतावतार अशा चार स्थिती आहेत. याबद्दल आपण ऐकले तरी त्याला एकदा तरी भेटण्याची इच्छा होते. केवळ साधूचा अवतार हा अभंग प्रीती देईल. यासाठी मोरारी बापूंनी अध्यात्मातील श्री संत तुकाराम महाराजांचा दाखला दिला.
श्री संत तुकाराम महाराज विठ्ठलाला म्हणतात, गीता जेणे उपदेशिली । तेही विठ्ठल माऊली ॥ असे विठ्ठलाचे वर्णन तुकाराम महाराजांनी केले आहे. तुकाराम महाराजांच्या घरात मातीची भांडी होती. छत्रपती शिवाजी महाराजांना हे समजल्यावर त्यांनी श्री संत तुकाराम महाराजांना तांब्याची भांडी घरी पाठवून दिली. श्री संत तुकाराम महाराज घरी आले तेव्हा भांडे बघून त्यांना दुसर्याच्या घरात आलो की काय, असा भास झाला. मात्र, पत्नीला पाहून ते स्थिरावले.
तेव्हा पत्नीने छत्रपती शिवाजी महाराजांनी ही भांडी पाठवल्याचे सांगितले. त्यावर श्री संत तुकाराम महाराज म्हणाले, की ही भांडी लोकांना वाटून टाक. या भांड्यावर आपला नाही, तर इतरांचा अधिकार आहे. याला म्हणतात हित अभंग. स्वतःचे देहभान अवतीभवतीचे सर्व विसरून जे माझं आहे ते सर्व तुझंच आहे, अशी भावना ज्याची असते त्याचीच प्रीती अभंग पावते, असा अर्थ मोरारी बापू यांनी सांगितला.