

देहुगाव : देहूतील महाप्रवेशद्वारावर नागरिकांकडून भगवी पताका लावण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा भगवी पताका फडकू लागली आहे. संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यापूर्वी ही वैष्णव धर्माची भगवी पताका देहू देवस्थान अथवा देहुनगर पंचायत प्रशासनाने लावणे आवश्यक होते. परंतु, ही पताका लावण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी पुढाकार घेतल्यानेे महाप्रवेशद्वारावर पुन्हा भगवी पताका दिमाखाने फडकू लागली आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष
देहू-आळंदी परिसर विकास समितीच्या वतीने महाप्रवेशद्वार उभे केले आहे आणि या प्रवेशद्वारावर असलेल्या कळसावर वैष्णव धर्माची पताका लावण्यात आली. कोरोनाच्या काळात भगवी पताका जीर्ण झाली होती. दयनीय अवस्था पाहून अनेक भाविक-भक्तांनी देहू नगरपंचायत प्रशासन आणि देहू देवस्थानच्या हलगर्जीपणावर नाराजी व्यक्त केली होती. काही भाविकांनी देहू देवस्थान आणि देहूनगर पंचायत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. तरीदेखील प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते.