पुणे: रेल्वेबद्दल माहिती देणारे जोशी संग्रहालय असो वा दुर्मीळ वस्तूंचा खजिना असलेले राजा दिनकर केळकर संग्रहालय... पर्वतीवरील पेशवे संग्रहालयासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय अशा विविध संग्रहालयांमधील दुर्मीळ खजिना सोशल मीडियावरही रील्स, व्हिडीओ अन् छायाचित्रांच्या रूपाने पाहायला मिळत आहे.
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी संग्रहालयांकडून सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. संग्रहालयातील रोजच्या घडामोडी असो वा संग्रहालयातील वस्तूंची माहिती... याचे अपडेट्स इन्स्टाग्राम, फेसबुकवर दिले जात असून, सोशल मीडियामुळे संग्रहालयांमध्ये येणार्या पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. (Latest Pune News)
पुण्यात अंदाजे 30 हून अधिक संग्रहालये आहेत. त्यातील काही वस्तुसंग्रहालये आता तंत्रस्नेही बनली आहेत. आता वस्तुसंग्रहालयाचा इतिहास असो, येथील दुर्मीळ-जुन्या वस्तूंची माहिती असे सारेकाही सोशल मीडियाद्वारे लोकांसमोर येत असून, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल अॅप अन् फेसबुक-इन्स्टाग्राम पेजद्वारे संग्रहालयांकडून माहिती पोहचवली जात आहे.
काही संग्रहालयांकडून संकेतस्थळावर रोजची छायाचित्रे आणि व्हिडीओ अपलोड केले जात आहेत. त्यासाठी सोशल मीडिया हाताळणारी वेगळी टीम तयार करण्यात आली आहे. त्यामुळे संग्रहालयांची माहिती जगभरातील पर्यटकांपर्यंत पोहचत आहे. रविवारी (दि. 18 मे) साजर्या होणार्या जागतिक संग्रहालय दिनानिमित्त दै. ‘पुढारी’ने घेतलेला हा आढावा.
राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे संचालक सुधन्वा रानडे म्हणाले की, संग्रहालयाला वर्षभरात एक लाख 30 हजार पर्यटक भेट देत आहेत. रोज किमान 250 ते 300 पर्यटक संग्रहालयाला भेट देत असून, अधिकाधिक पर्यटकांनी संग्रहालयाला भेट द्यावी, संग्रहालयाचा इतिहास, वस्तूंची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचावी, यासाठी आम्ही इन्स्टाग्राम, फेसबुकवर संग्रहालयातील घडामोडींचे रोजचे अपडेट्स, व्हिडीओ, छायाचित्रे पोस्ट करीत आहोत.
आमचे रेल्वे प्रतिकृतींचे संग्रहालय असून, संग्रहालयाला अधिकाधिक पर्यटकांनी भेट द्यावी म्हणून आम्ही सोशल मीडियाचा वापर सुरू केला आहे. इन्स्टाग्रामवर रील्स, फेसबुकवर संग्रहालयाशी संबंधित छायाचित्रे, व्हिडीओ, संदेश आणि रोजचे अपडेट्स आम्ही पोस्ट करीत आहोत. या आमच्या प्रयत्नाला प्रतिसाद मिळत असून रील्स, व्हिडीओलाही प्रतिसाद आहे. काळाप्रमाणे बदलत आम्ही सोशल मीडियाचा वापर करीत असून, पर्यटकांना संग्रहालय भेटीसाठी उद्युक्त करण्यासाठी आम्ही त्याचा योग्य वापर करीत आहोत.
- देवव्रत जोशी, जोशीज म्युझियम ऑफ मिनिएचर रेल्वेज