पुणे : अंगडियावरील दरोड्याचा प्लॅन जेलमध्येच ठरला!

पुणे : अंगडियावरील दरोड्याचा प्लॅन जेलमध्येच ठरला!
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कारागृहात असतानाच सराईतांनी मार्केट यार्डातील अंगडियाच्या (कुरिअर) कार्यालयावर दरोडा टाकून रोकड लुटण्याचा कट रचला होता. रोकड लुटल्यानंतर अंगडिया पोलिसात तक्रार करीत नाहीत, अशी त्यांची माहिती होती. त्यासाठी त्यांनी रेकी करून गोळीबार करीत सूत्रबद्ध पद्धतीने तब्बल 27 लाख 45 हजार रुपयांची रोकड भर दिवसा लुटून पळ काढला होता. या गुन्ह्याचा छडा लावत गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने सात जणांना मुळशी तालुक्यातील पवना डॅम परिसरातील एका हॉटेलमध्ये अटक केली, अशी माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी अप्पर पोलिस आयुक्त (गुन्हे ) रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे उपस्थित होते. चोरट्यांकडून 11 लाख 18 हजारांची रोकड, सात मोबाइल, तीन दुचाकी, कोयता, असा 13 लाख 43 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अविनाश ऊर्फ सनी रामप्रताप गुप्ता (वय 20, रा. मंगळवार पेठ), आदित्य अशोक मारणे (वय 28, रा. रामनगर, वारजे), दीपक ओमप्रकाश शर्मा (वय 19, रा. राहुलनगर, शिवणे), विशाल सतीश कसबे (वय 20, रा. मंगळवार पेठ), अजय बापू दिवटे (वय 23, रा. रामनगर, वारजे), गुरुजनसिंह सेवासिंह वीरक (वय 20, रा. शिवाजीनगर), नीलेश बाळू गोठे (वय 20, रा. मंगळवार पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

इतर पाच फरारी आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. एकूण बारा जणांनी अंगडियाच्या कार्यालयातील रोकड लुटण्याचा गुन्हा केला असल्याचे पोलिसांच्या आजपर्यंतच्या तपासात समोर आले आहे. मार्केट यार्डातील भुसार बाजार परिसरात पी. एम. कुरिअर कंपनीच्या कार्यालयात शनिवारी (12 नोव्हेंबर) शिरून पाच जणांनी 27 लाख 45 हजारांची रोकड लुटली.

याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. हा गुन्हा सराईत गुन्हेगार अविनाश गुप्ता यानेच केल्याची माहिती खंडणीविक्षरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक अजय वाघमारे यांना मिळाली. सखोल तपासाअंतीत ते मुळशी तालुक्यातील पवना डॅम परिसरात असलेल्या एका हॉटेलध्ये असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने छापा टाकून सात जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय वाघमारे, उपनिरीक्षक विकास जाधव, यशवंत ओंबासे, अमोल आव्हाड, किरण ठवरे, मयूर तूपसौंदर, सयाजी चव्हाण, प्रमोद सोनवणे, संजय भापकर, हेमा ढेबे, नितीन कांबळे आदींनी ही कारवाई केली.

दीड महिन्यापासून रेकी
अविनाश गुप्ता, ओंकार आल्हाट आणि सोनू खुडे हे तिघे येरवडा कारागृहात होते. त्या वेळी त्यांनी दरोड्याचा कट रचला. त्यासाठी दीड महिन्यापासून अंगडिया कार्यालयाची व परिसराची त्यांनी रेकी केली. लुटीसाठी त्यांनी दोन गट तयार केले होते.

या गुन्ह्यातील दोन आरोपींना मोका लावलेला आहे, त्यामध्ये ते फरारी होते. आरोपी कारागृहात असतानाच त्यांनी दरोडा टाकण्याचा कट रचला. त्यानंतर त्यांनी हा गुन्हा केला. पोलिसांनी सात जणांना दोन दिवसांतच अटक केली. आणखी 4 ते 5 जण फरारी आहेत.
                                                           -अमिताभ गुप्ता,
                                                           पोलिस आयुक्त

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news