

कुरकुंभ; पुढारी वृत्तसेवा: राहुल ज्वेलर्स अॅड सराफ या सोने-चांदी विक्रीच्या दुकानाची भिंत अज्ञात दरोडेखोरांनी फोडली. मात्र, स्थानिकांची सतर्कता आणि घटनास्थळी दाखल झालेल्या कुरकुंभ पोलिसांमुळे चोरीचा प्रयत्न फसला. कुरकुंभच्या मुख्य चौकात राहुल ज्वेलर्स दुकान आहे. बुधवारी (दि.14) रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लगतच्या मोकळ्या जागेत जाऊन दुकानाच्या एका बाजूची भिंत हत्याराने फोडण्यास सुरुवात केली. भिंतीला लहान भगदाडही पाडले. त्याचदरम्यान हा प्रकार शेजारील प्रकाश कुलथे यांना दिसून आला. त्यांनी त्वरित स्थानिक सनी सोनार व इतरांना माहिती दिली.
सोनार यांनी कुरकुंभ पोलिसांना कळविले. पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. सहायक फौजदार संभाजी साळुंके, श्रीरंग शिंदे, हवालदार शंकर वाघमारे, महेश पवार, सागर म्हेत्रे, पोलीस मित्र सचिन साळुंके, आबा शितोळे, स्थानिक रहिवासी सनी सोनार, प्रकाश कुलथे, रशीद मुलाणी आदी दरोडेखोरांच्या दिशेने गेले. परंतु, अंधाराचा फायदा घेत दरोडेखोर पळून गेले.
दिवसा परिसराचे निरीक्षण
राहुल ज्वेलर्स अॅड सराफ या दुकानाभोवती मोकळी जागा असून, त्याला पत्र्याचे कुंपण व अडचणीची जागा आहे. त्यामुळे कोणी बघण्याचा धोका नाही. दरोडेखोरांनी दिवसा दुकानासह परिसराचे निरीक्षण केले असण्याची शक्यता आहे.