बारामती : निरा डावा कालव्याच्या दुरुस्तीचे काम निम्म्यावर

बारामती : निरा डावा कालव्याच्या दुरुस्तीचे काम निम्म्यावर

Published on

बारामती; पुढारी वृत्तसेवा : सोमेश्वरनगर परिसरात जलसंपदा विभागाकडून निरा डावा कालव्याच्या दुरुस्तीचे सुरू असलेले काम निम्म्यावर आले आहे. दुरुस्तीचे काम बंद असल्याने कालव्याला पाणी सोडावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. जलसंपदा विभागाने कालव्याची दुरुस्ती करणे, भराव उंच करणे, मुरमीकरण करणे, खोदाई आणि स्वच्छता करणे आदी कामे पूर्ण केली आहेत. कालवादुरुस्तीमुळे तरीही पाझर कमी होणार असल्याने विहिरी, बोअरवेल, पाणीपुरवठा योजनांचे पाणी कमी होण्याच्या शक्यतेने शेतकर्‍यांच्या मनात भीती कायम आहे. सध्या करंजेपूल ते निंबूत छपरीपर्यंत काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.

सुरुवातीला तालुक्यातील शेतकर्‍यांनी सिमेंटच्या अस्तरीकरणाला विरोध केल्यानंतर जलसंपदा विभागाने शेतकर्‍यांची बैठक घेत फक्त कालव्याची खोदाई व दुरुस्तीच करणार असल्याचे सांगितले. अस्तरीकरणामुळे शेतकरी देशोधडीला लागणार असल्याने हे काम बंद करीत फक्त दुरुस्तीचे काम सुरू केले. मात्र, दुरुस्तीमुळे कित्येक दिवसांपासून कालव्याला पाणी सोडले नाही. पर्यायाने पिकांची तहान भागविण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत.

निरा खोर्‍यातील बहुतांश शेती निरा डावा कालव्यावर अवलंबून आहे. यातही ऊसशेती मोठी असल्याने जास्तीच्या पाण्याची गरज आहे. कालव्याच्या पाण्याचे योग्य पध्दतीने नियोजन होण्यासाठी पाणी वापर संस्थांवर लक्ष दिल्यास पाणीबचतीचा उद्देश सफल होणार आहे. सोमेश्वरनगर परिसरात कालव्याच्या दुरुस्तीचे काम रात्रंदिवस सुरू असल्याने शेतकर्‍यांची काळजी वाढली आहे. भविष्यात खरेच शेतीला पाणी उपलब्ध होईल का? ही धास्ती शेतकर्‍यांना सतावत आहे.

अस्तरीकरणासाठी जलसंपदा विभागाने टप्प्याटप्प्याने काम केले. बारामती शहरात सिमेंट क्राँक्रीट झाले तर काही ठिकाणी कालवा फुटण्याचा धोका असेल त्या ठिकाणी दुरुस्ती करण्यात आली. अस्तरीकरणामुळे गावातील बोअर, चारी आणि विहिरींचे पाणी कायमस्वरूपी जाईल. शेकडो हेक्टरवरील पिके, ऊसशेती धोक्यात येईल. पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होईल. दुग्धव्यवसाय, पोल्ट्री व्यवसाय आदी शेती आधारित उद्योग संकटात येतील, वन्यजीव आणि झाडे नष्ट होतील. शेतकरी, शेतमजूर, गावातील व्यापार व अर्थकारणावर परिणाम होईल, शेतकर्‍यांवर कर्ज वाढून आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नसल्याचे शेतकर्‍यांचे मत आहे.

टँकरने पाणी आणण्याची कारखान्यावर वेळ
सोमेश्वर कारखान्याचे गाळप सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. कालव्याचे पाणी बंद असल्याने कारखान्याला पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे सोमेश्वर कारखान्याला मुरुम येथील निरा नदीवरून व परिसरातून टँकरद्वारे लाखो लिटर पाणी आणत हंगाम सुरू ठेवण्याची वेळ आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news