पुणे : दुसर्‍या दिवशीही पावसाचे धुमशान

पुणे : दुसर्‍या दिवशीही पावसाचे धुमशान

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात सलग दुसर्‍या दिवशी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने रस्त्यांवर तळी साचली. हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला. शहराच्या सर्वच भागांत पावसाचा जोर इतका होता की समोरचे काहीच दिसत नव्हते. गुरुवारी आलेल्या पावसाने पुन्हा एकदा नागरिकांना चिंब भिजवले. तासाभरांत शहरात सरासरी 3.5 मी.मी.पावसाची नोंद झाली. दरम्यान, 20 मार्चपर्यंत वेधशाळेने शहरात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

बुधवारी शहरात पाऊस झाला. हा पााऊस रात्री झाल्याने फार लोकांची तारांबळ उडाली नाही. बुधवारी शहरातील विविध भागांत सरासरी 2 ते 3.5 मि. मी. पावसाची नोंद झाली होती. गुरुवारी दुपारी 4.30 वाजता पुन्हा आभाळ काळ्याभोर ढगांनी भरून आले. धो धो पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने दाणादाण उडवून टाकली. शहरातील सखल भागात पाणी शिरले रस्त्यांवर तळी साचली अन् वातावरणात गारवा निर्माण झाला. शहरातील सर्व पेठा, उपनगरांत एका वेगाने पाऊस
पडत होता.

हवामान विभागाचा तासभर आधी अलर्ट
शहरात जोरदार पावसाचा अंदाज बुधवारीच पुणे वेधशाळेने वर्तवला होता. तसेच गुरुवारी दुपारी 3.30च्या सुमारास वेधशाळेतील शास्त्रज्ञ जॉन्सन सॅम्युअल यांनी शहरातील सर्वच ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, असा सावधानतेचा इशारा दिला होता.त्याप्रमाणे तासाभरातच जोरदार पाऊस झाला.

सायंकाळी 6.35 पर्यंत मोजलेला पाऊस
शिवाजीनगर : 3.6 मि. मी.
पाषाण : 3.6 मि. मी.
लोहगाव ः 0.2 मि. मी.
चिंचवड : 7 मि. मी.
लवळे ः 0.5 मि. मी.
मगरपट्टा ः 1 मि.मी.

उपनगरांतही धो धो बसरला

उपनगरांत ठिकठिकाणी गुरुवारी सायंकाळी जोरदार अवकाळी पाऊस झाला, यामुळे नागरिक व वाहनचालकांची धांदल उडाली. पौड रोड पाण्याखाली गेल्याचे चित्र दिसून आले. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला.

पौड रोड : पौड रोड परिसरात अचानक जोरदार पाऊस सुरू झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. रस्ते जलमय झाल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागली. सायंकाळी धावपळ झाली.

खडकवासला : सिंहगड रोड, हवेली तालुक्याच्या पश्चिम भागात सायंकाळी ढगांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. यामुळे पर्यटकांसह भाजीपाला विक्रेते, नागरिकांची धांदल उडाली. खडकवासला येथे दुपारी चार ते पाच वाजेपर्यंत 11 मिलिमीटर पाऊस पडला. डोणजे, खानापूर परिसरात गारा पडल्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news