

वालचंदनगर (ता. इंदापूर); पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यासह राज्यभरातील शेती महामंडळाच्या 14 मळ्यावरील कामगारांना राहण्यासाठी प्रत्येकी दोन गुंठे जागा देण्यात यावी व खंडकरी शेतकर्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हिवाळी अधिवेशनात आवाज उठविला असून, लवकरच हे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्याची माहिती भरणे यांनी दिली आहे.
राज्यातील पुणे, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, सातारा व औरंगाबाद या सात जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या एकूण 14 मळ्यांवर हजारो कामगारांची कुटुंबे जीव धोक्यात घालून पडक्या घरांमध्ये राहत आहेत. घरांची अवस्था दयनीय झाली आहे. या कामगारांना शासनाच्या इंदिरा आवास योजनेतून घरकुले मंजूर आहेत. मात्र, जागेअभावी त्यांना घर बांधता येत नाही. इंदापूर तालुक्यात यापैकी रत्नपुरी मळ्यावरील कामगारांकडून याबाबत वारंवार भरणे यांच्याकडे राहण्यासाठी जागेची मागणी होत होती.
भरणे यांनी यापूर्वीही कामगारांच्या राहण्याच्या जागेबाबत सरकारला खडे बोल सुनावले आहेत. सध्या नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात भरणे यांनी सोमवारी (दि. 26) पुन्हा या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधून घेतले. याशिवाय खंडकरी शेतकर्यांच्या मिळालेल्या जमिनी भोगवटा वर्ग क्रमांक 2 च्या असून, शासनाने दहा वर्षांनंतर या जमिनींचे भोगवटा वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्याचे घोषित केले होते.
मात्र, अद्याप शेतकर्यांच्या जमिनीवरील शेरा निघाला नसल्याने शेतकर्यांना कोणत्याही प्रकारचे शेतीकर्ज घेता येत नाही. त्यामुळे तातडीने याबाबत निर्णय घेण्यासंदर्भात सरकारकडे मागणी केली. तसेच, शेती महामंडळाकडून खंडकरी शेतकर्यांना वाटप करण्यात आलेल्या बर्याच जमिनी या क्षारपड व नापीक आहेत. त्या जमिनी बदलून देण्यात याव्यात, अशीही मागणी लक्षवेधीच्या माध्यमातून केली.
शेती महामंडळ कामगार व कर्मचारी यांना
शेती महामंडळाकडे थकीत असणारा 4 थ्या व 5 व्या वेतन आयोगाचा फरक देण्यात यावा व 6 वा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी केली.
विखे पाटील यांचे आश्वासन
याबाबत उत्तर देताना महसूलमंत्री विखे पाटील म्हणाले की, शेती महामंडळ कामगारांचा प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचा असून, सरकार याबाबत सकारात्मक आहे. आपण लवकरच याबाबत कामगारांशी बैठक घेऊन निर्णय घेऊ. प्रामुख्याने खंडकरी शेतकर्यांच्या सातबारावरील भोगवटा वर्ग 2 चा शेरा येत्या एका महिन्यात उठवण्याची ग्वाही दिली.