पुणे : कुष्ठरुग्णांमध्ये मुलांचे प्रमाण पाच टक्क्यांहून अधिक

पुणे : कुष्ठरुग्णांमध्ये मुलांचे प्रमाण पाच टक्क्यांहून अधिक
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गेली दोन वर्षे संपूर्ण आरोग्ययंत्रणा कोरोनाच्या संकटाशी दोन हात करीत होती. त्यामुळे इतर आजारांचे सर्वेक्षण, तपासणी आणि उपचार, यावर परिणाम झाला. दोन वर्षांतील अंतर भरून काढण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागातर्फे आक्रमक मोहीम राबविण्यात आली आहे. ताज्या सर्वेक्षणानुसार गेल्या सहा महिन्यांत आढळलेल्या नवीन कुष्ठरुग्णांपैकी 5 टक्क्यांहून जास्त रुग्ण 14 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.

2005 मध्ये कुष्ठरोगाचा प्रसार देशातील 10 हजार लोकांमागे 1 वर आला आणि जागतिक आरोग्य संघटनेने ठरवून दिलेले राष्ट्रीय निर्मूलन लक्ष्य गाठण्यात भारताला यश आले होते. मात्र, 2016 नंतर कुष्ठरुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली. कुष्ठरोगनिर्मूलन शक्य असले आणि मृत्यूची नोंद केली जात नसली, तरी रुग्णांची मानसिक कुचंबणा आणि सामाजिक कलंक, यामुळे त्रास होतो.

कुष्ठरोगास कारणीभूत असलेल्या बॅक्टेरियाचा उष्मायन कालावधी 2-5 वर्षांपर्यंत असू शकतो आणि त्यामुळे रोग पूर्णपणे नष्ट झाल्याचे घोषित करणे कठीण होते.एखाद्या रुग्णाचा शोध घेतल्यानंतर प्रशासनातर्फे रुग्णाला औषध पुरविले जाते आणि पूर्ण उपचार दिले जातात. उपचारांचा कालावधी सुमारे सहा महिने ते दोन वर्षांचा असतो. लहान मुलांमध्ये कुष्ठरुग्णांची ओळख कम्युनिटी ट्रान्समिशन ओळखण्यासाठी आवश्यक आहे आणि हॉटस्पॉट ओळखण्यासाठी देखील महत्त्वाची आहे.

बॉम्बे कुष्ठरोग प्रकल्पाचे संचालक, डॉ. विवेक व्ही. पै यांनी सांगितले की, लहान मुलांमधील कुष्ठरोगाची ओळख पटविणे आवश्यक आहे. यातून समुदाय प्रसाराची क्षेत्रे जाणून घेणे आणि हॉटस्पॉटचे क्षेत्र देखील ओळखणे आवश्यक आहे. ज्या भागात मुलांमधील कुष्ठरोगाचे निदान होते. तेथील संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रभावीपणे उपचार करावे लागतील.

नवीन रुग्णांचे विश्लेषण करून राज्यातील नवीन हॉटस्पॉट शोधले जात आहेत. सहायक संचालक डॉ. रामजी आडकेकर म्हणाले, कुष्ठरोगाचे संपूर्ण निर्मूलन घोषित करणे कठीण आहे. कारण, एक ते 20 वर्षांच्या दरम्यान लक्षणे दिसू शकतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशांकानुसार कुष्ठरोग हा बॅसिलस, मायकोबॅक्टेरियम लेप्रीमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. उष्मायन कालावधी सरासरी 5 वर्षांचा असतो.

काय होतो परिणाम
कुष्ठरोगाचा परिणाम प्रामुख्याने त्वचेवर, श्वसनमार्गावरील त्वचा आणि डोळे यावर होतो. हा आजार बहुऔषध थेरपीने बरा होतो. कुष्ठरोगावर वेळीच उपचार न केल्यास रुग्णाच्या वारंवार संपर्कात असताना नाक आणि तोंडातून थेंबांद्वारे प्रसार होण्याची शक्यता असते. उपचार न केल्यास कुष्ठरोगामुळे त्वचा, नसा, हातपाय आणि डोळे यांचे कायमचे नुकसान होऊ शकते.

अशी आहे राज्यातील स्थिती

वर्ष कुष्ठरुग्ण लहान मुलांमधील टक्केवारी प्रमाण
2017-18 16065 1624 10.10
2018-19 15299 1358 8.87
2019-20 16531 1360 8.22
2020-21 12438 922 7.41
2021-22 14520 1092 7.52
2022-23 12540 724 5.77
(सप्टेंबरपर्यंत)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news