पुणे : एक मेच्या मुहूर्तासाठी लगीनघाई ! चांदणी चौकातील प्रकल्प 86 टक्के पूर्ण

पुणे : एक मेच्या मुहूर्तासाठी लगीनघाई ! चांदणी चौकातील प्रकल्प 86 टक्के पूर्ण
Published on
Updated on

ज्ञानेश्वर बिजले : 

पुणे : चांदणी चौकातील नवीन पुलाचे उद्घाटन महाराष्ट्रदिनी 1 मे रोजी करण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केल्यानंतर हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची (एनएचएआय) लगीनघाई सुरू झाली आहे. दै. 'पुढारी'ने बुधवारी चांदणी चौकात पाहणी केली असता कामे युद्धपातळीवर सुरू असल्याचे दिसून आले. प्रकल्पाची 86 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. मेपर्यंत उर्वरित कामे पूर्ण करण्याचे प्राधिकरणाचे नियोजन होते. दरम्यान, गडकरी यांनी 1 मे रोजी उद्घाटनासाठी पूल तयार असेल, असे जाहीर केले. त्यामुळे राहिलेल्या दीड महिन्यात काम पूर्ण करण्याचे आव्हान प्राधिकरणासमोर उभे ठाकले आहे.

चांदणी चौकातील बावधन बाजूची खडकाची खोदाई झाली असून, नवीन पुलासाठी खांब उभारले आहेत. एनडीए बाजूच्या खडकाची खोदाई सुरू असून, तेथे खांबाच्या पायासाठी खोदकाम सुरू आहे. खांबाची उभारणी पूर्ण झाल्यानंतर त्यावर लोखंडी गर्डर टाकण्यात येतील. दीड महिन्यात नवीन सहापदरी पूल बांधल्यानंतर त्यावरून बावधनकडून एनडीएकडे ये-जा करता येईल तसेच कोथरूड व मुळशीकडून बावधनकडे जाता येईल.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी बुधवारी अधिकार्‍यांसमवेत चांदणी चौक प्रकल्पाची पाहणी केली आणि बैठक घेतली. महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, उपव्यवस्थापक अंकित यादव, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे, सल्लागार अभियंता भारत तोडकरी या वेळी उपस्थित होते. बावधनकडून सातार्‍याकडे जाणार्‍या मार्गाचा रॅम्प आणि मुळशी ते कोथरूड या भुयारी मार्गाचे काम पंधरवड्यात पूर्ण होईल. मुंबईहून कोथरूडकडे जाणार्‍या सेवा रस्त्याचे काम महिनाभरात होणार आहे. एनडीए सर्कलचे सुशोभीकरण करण्यात
येणार आहे.

चांदणी चौकातील जुना पूल स्फोटकाच्या साह्याने 2 ऑक्टोबरला पाडण्यात आला. त्या वेळी पुलाखाली असलेल्या चार लेनच्या जागी आता आठ लेनमधून वाहतूक सुरू झाली. महामार्गावरून सहापदरी वाहतूक सुरू झाली. काही सेवा रस्ते आणि रॅम्पवरून वाहतूक सुरू केली. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटली. नवीन पुलाचे काम येत्या दीड महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
                                                           – डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news