

बारामती: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर बारामती तालुक्यात होणार्या ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी गावगाड्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. प्रत्येक गावातील पारावर निवडणुकीच्या चर्चा रंगात येत असून, महायुती व महाविकास आघाडीचे जागावाटप कसे होणार? उमेदवार कोण असणार? बंडखोरी होणार का? असे अनेक प्रश्न कार्यकर्त्यांना सतावत आहेत. उमेदवारी नक्की कुणाला मिळणार? याची चिंता नेत्यांऐवजी कार्यकर्त्यांनाच जास्त लागली आहे.
ऐन उन्हाळ्यात गेल्या वर्षी लोकसभा निवडणूक पार पडली. जिल्ह्यात दोन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. यानंतर नुकतीच छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडली. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या विचारांचे संचालक मंडळ निवडून आणले. (Latest Pune News)
सध्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. गेल्या वर्षभरापासून बारामती तालुक्यात लोकसभा, विधानसभा, छत्रपती कारखाना आणि त्यानंतर माळेगाव सहकारी साखर कारखाना अशा टप्प्याटप्प्याने निवडणुका पार पडत असल्याने कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस आले आहेत.
या निवडणुकीनंतर ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार असल्याने अनेक इच्छुकांनी आत्तापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी रंगात येणार असून, कोणत्या मतदारसंघातून या वेळी कोण बाजी मारतो, याचे आडाखे बांधले जात आहेत.
निवडणुकीच्या आखाड्यात आता नव्याने रंग भरू लागले आहेत. गावकी-भावकीचे राजकारण या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता अंग झाडून कामाला लागला आहे. पारावर तसेच चौकाचौकांत व कट्ट्या-कट्ट्यावर सर्वत्र निवडणुकीचीच चर्चा सुरू आहे.