

पुणे; पुढारी वृत्तसेवा : रस्त्याने चालत निघालेल्या पादचार्यांना दुचाकीस्वार चोरट्यांकडून टार्गेट केले जात आहे. वेगात आलेल्या चोरट्यांकडून अवघ्या काही सेकंदात हातातील मोबाईल, पर्स, गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले जात आहे. अनेकदा जबरी चोरी रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जातात. मात्र, त्यांना फारशे यश मिळत नसल्याचे दिसून येत आहे. शहरातील विविध भागात जबरी चोरीच्या तीन घटना घडल्या आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मंगला टॉकीजसमोरील पुलावर असलेल्या फुटपाथवरून पायी चालत निघालेल्या एका व्यक्तीला दोघांनी लुटले. त्यांच्याकडून दहा हजार रुपयांचा मोबाईल व सातशे रुयांची रोकड पँटच्या खिशातून जबरदस्तीने हिसकावण्यात आली. याबाबत भेकराईनगर येथील 35 वर्षीय व्यक्तीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पानकर करीत आहेत.
दुसरी घटना शहरातील फुरसुंगी परिसरात 30 नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली आहे. शतपावली करत असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील 40 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावले. याबाबत 45 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तर तिसरी घटना शांतीनगर- कोंढवा परिसरात घडली आहे. 30 नोव्हेंबर रोजी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास रस्त्याने पायी चालत निघालेल्या एका महिलेच्या गळ्यातील 14 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी चोरी केले. याप्रकरणी टिळेकरनगर कोंढवा येथील 52 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार कोंढवा पोलिसांनी दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.