जुन्नरमध्ये गल्लोगल्ली भटकी कुत्री, मोकाट जनावरे

जुन्नरमध्ये गल्लोगल्ली भटकी कुत्री, मोकाट जनावरे
Published on
Updated on

जुन्नर : पुढारी वृत्तसेवा :  जुन्नर शहरात भटक्या कुत्र्यांच्या व मोकाट जनावरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढलेला असून त्याचा त्रास सर्वसामान्यांना सोसावा लागत आहे. शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर ही भटकी कुत्री टोळक्यांनी फिरत असल्याने या भटक्या कुत्र्यांच्या त्रास शालेय विद्यार्थी, महिला, वृद्ध, व्यापारी तसेच नागरिकांना सहन करावा लागत आहे. मुख्याधिकारी या प्रश्नाकडे गांभीर्याने कधी पाहणार, असा सवाल केला जात आहे. नगरपरिषदेकडे लेखी तक्रार करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याने भटक्या कुर्त्यांची व मोकाट जनावरांची समस्या सोडवण्यात नगरपालिका अपयशी ठरत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

शहरातील बाजारपेठेच्या वर्दळीच्या भागात भटक्या कुत्र्यांच्या व मोकाट जनावरांचा वावर वाढलेला असून दिवस-रात्र ही कुत्री रस्त्यावर घोळक्याने फिरत राहतात. अनेकदा ही कुत्री पादचारी तसेच दुचाकी, चारचाकीच्या मागे जोरजोरात भुंकत पळत राहिल्याने तसेच प्रसंगी दुचाकीला अचानक आडवी आल्याने दुचाकीस्वाराचा अपघात घडून काहींना शारीरिक दुखापत झाली आहे. मात्र, कुंभकर्णी झोपेचे सोंग घेतलेल्या नगरपालिका प्रशासनाला कधी जाग येणार असा प्रश्न सर्वासामान्य नागरिकांना पडला आहे.

पेट्स फोर्स या संस्थेला दिली जबाबदारी
जुन्नर नगरपरिषदेकडून पेट्स फोर्स या संस्थेवर भटक्या कुर्त्यांमुळे निर्माण होणार्‍या समस्येचे निराकरण करण्याची जबाबदारी देण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून जुन्नर शहराच्या सर्व भागातील भटके श्वान पकडून त्यांच्यावर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. जेणेकरून भटक्या श्वानांच्या वाढीवर नियंत्रण ठेवता येणार आहे, तसेच त्यांना रेबीज प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे.

तक्रार आल्यास कारवाई करणार
भटक्या श्वानांबाबत नागरिकांकडून तक्रार आल्यास त्याची तातडीने आरोग्य विभाग दखल घेऊन संबंधित भागात जाऊन भटके श्वान पकडून त्यांना जवळच्या केंद्रात दाखल करणार आहेत. तेथे त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया करण्याबरोबरच त्यांना अँटी रेबीज लस दिली जाणार असल्याचे आरोग्य विभागप्रमुख नागनाथ बिराजदार व आरोग्य निरीक्षक दिप्ती कुलकर्णी यांनी सांगितले.

नवीन वर्षी 46 रुग्णांवर उपचार
ग्रामीण रुग्णालय जुन्नर यांचेकडील आकडेवारीनुसार एप्रिल 2023 पासून ते जानेवारी 2024 पर्यंत 418 रुग्णांवर श्वानदंशावरील उपचार करण्यात आले आहेत. यापैकी नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात 46 रुग्णांवर श्वानदंशावरील उपचार करण्यात आले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news