

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोहगाव येथील बहुप्रतीक्षित नवीन विमानतळ टर्मिनलचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, ते सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल आणि त्यानंतर ऑक्टोबर 2023 पासून हे टर्मिनल प्रवाशांसाठी सुरू होणार आहे. त्यामुळे पुणेकर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने याबाबतची माहिती गुरुवारी (दि.17) सायंकाळी टि्वटरच्या माध्यमातून दिली. गेल्या अनेक दिवसांपासून जुन्या विमानतळ टर्मिनलवर क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची ये-जा सुरू होती. त्यामुळे जुन्या टर्मिनलवर प्रवाशांचा मोठा भार आला होता.
आता हे टर्मिनल ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणार असल्यामुळे पुणेकर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तब्बल 475 कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून गेल्या अनेक वर्षांपासून या नव्या टर्मिनलचे काम सुरू होते. तो प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जात असून, येत्या ऑक्टोबर महिन्यानंतर पुणेकरांना या टर्मिनलचा वापर करता येणार आहे.
टर्मिनलची वैशिष्ट्ये
जुने विमानतळ टर्मिनल : 22 हजार चौरस मीटर
नवीन विमानतळ टर्मिनल : 5 लाख चौरस फुटांपेक्षा
अधिक क्षेत्रफळ
जुन्या टर्मिनलची प्रवासी क्षमता : 80 लाख (वार्षिक)
नवीन टर्मिनल प्रवासी क्षमता : 1 कोटी 90 लाख (वार्षिक)
टर्मिनलवर या सुविधा
प्रवाशांना विमानापर्यंत पोचविणारे 5 नवीन मार्ग (पॅसेंजर बोर्डिंग बि—ज)
8 स्वयंचलित जिने (एस्केलेटर)
15 लिफ्ट
34 चेक-इन काउंटर
प्रवासी सामान वहन यंत्रणा
आगमन क्षेत्रात पाच कन्व्हेयर बेल्ट