…अन् आयुक्त उतरले रस्त्यावर; वाहतूक कोंडीवरील टीका पालिका आयुक्तांसह पोलिसआयुक्तांनीही घेतली मनावर

…अन् आयुक्त उतरले रस्त्यावर; वाहतूक कोंडीवरील टीका पालिका आयुक्तांसह पोलिसआयुक्तांनीही घेतली मनावर

पुणे; पुढारी वृत्तसेवा: शहरात होणार्‍या वाहतूक कोंडीवरून एकमेकांना पत्र पाठवून सल्ले देणारे महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्त यांनी वाहतूक कोंडीवरून होणारी टीका चांगलीच मनावर घेतली आहे. या दोन्ही आयुक्तांनी आपल्या वरिष्ठ अधिकार्‍यांना सोबत घेऊन शुक्रवारी शहरातील विविध रस्त्यांची पाहणी करून वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून विविध उपाययोजनांची चर्चा केली.

पावसाळ्यापासून शहरातील बहुतांश रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. समान पाणीपुरवठा योजना व अन्य सेवावाहिन्यांसाठीच्या खोदाईमुळे रस्ते खड्डेमय झाल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. अशातच वाहतूक पोलिसांचे अस्तित्वच जाणवत नसल्याने पुणेकरांची गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळी देखील वाहतूक कोंडीमध्येच गेली.

यावरून सर्वच स्तरांतून टीका सुरू झाल्यानंतर महापालिकेने पोलिस प्रशासनास पत्र देऊन जड वाहनांना प्रवेशबंदी करण्याचा व बेशिस्त रिक्षा व वाहनांवर कारवाई करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पोलिस प्रशासनाने पत्राला पत्राने उत्तर देत रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करण्यासोबतच बीआरटी मार्ग काढून टाकण्याचा सल्ला दिला.

पोलिस आणि महापालिका पालिका प्रशासनामध्ये एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याची स्पर्धा सुरू झाली. त्यामुळे दोन्ही प्रशासनाने समन्वयाची भूमिका घेत उपाययोजना करण्यास सुरुवात केली. पालिका प्रशासनाने खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले तसेच खड्डेमय रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी निविदा प्रक्रिया देखील राबविली.

तसेच विविध संस्थांच्या माध्यमातून 815 ट्रॅफिक वॉर्डनही उपलब्ध करून दिले, तर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी वाहतूक पोलिसांसोबतच पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांना जबाबदार धरत त्यांनाही वाहतूक नियंत्रणात गुंतविले. त्यानंतर महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आपल्या वरिष्ठ अधिकार्‍यांना सोबत घेऊन शुक्रवारी शहरात सुरू असलेल्या मोठ्या प्रकल्पांच्या ठिकाणी भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. त्यानुसार उपस्थित अधिकार्‍यांना उपाययोजनांबाबत सूचनाही दिल्या.

पोलिस आयुक्त गुप्ता यांनी सकाळी खराडी आणि जेल रोड परिसरातील रस्त्यांवर पाहणी केली. यानंतर विक्रम कुमार यांच्यासोबत गणेशखिंड रस्त्यावरील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, पुणे विद्यापीठ चौक, बाणेर, चांदणी चौक, नवले पूल आणि सिंहगड रस्ता परिसरात सुरू असलेल्या मेट्रो, उड्डाणपुलांच्या कामाच्या ठिकाणची पाहणी केली.

महापालिकेच्या अधिकार्‍यांना सोबत घेऊन बाणेर, पाषाण, चतु:शृंगी, पुणे विद्यापीठ आदी ठिकाणच्या वाहतूक कोंडीची पाहणी केली. यातील अनेक ठिकाणी मेट्रो आणि उड्डाणपुलाची कामे सुरू आहेत. ही कामे करताना रस्त्याचा मोठा भाग अडविला गेला आहे. तसेच इतरही अनेक अडथळे आहेत. हे अडथळे बाजूला केल्यास वाहतूक कोंडी निर्माण होणार नाही, असे महापालिकेच्या निदर्शनास आणून दिले आहे.

                                              – अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त, पुणे शहर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news