पुणे महापालिकेच्या थकबाकीचा डोंगर ! 9600 कोटी वसुलीसाठी राबवणार मोहीम

पुणे महापालिकेच्या थकबाकीचा डोंगर ! 9600 कोटी वसुलीसाठी राबवणार मोहीम

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असलेल्या मिळकतकर विभागाची तब्बल 9 हजार 600 कोटी रुपये थकबाकी मिळकधारकांकडे आहे. यामध्ये मोबाईल टॉवरचीच 2 हजार 270 कोटीची थकबाकी आहे. त्यामुळे ही थकबाकी वसूल होण्यासाठी महापालिका याच महिन्यात तीव्र स्वरूपात वसुली मोहिम हाती घेणार आहे. या मोहिमेत जप्ती आणि मिळकती सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. राज्य शासनाने मिळकतकरातील 40 टक्के सवलत पुर्ववत केल्याने महापालिकेचे उत्पन्न घटणार आहे. त्यामुळे महापालिकेने मिळकत करातून मिळणारे उत्पन्न वाढविण्यासाठी थकबाकीदारांकडून थकबाकी वसूल करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच निवासी मिळकतींचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांची व्यावसायिक दराने आकारणी करण्याचेही नियोजन केले आहे.

दरम्यान, महापालिकेची मिळकतकराची थकबाकी 9 हजार 600 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यामध्ये कराची मागणी 3 हजार 30 कोटी रुपयांची असून, 6 हजार 600 कोटी रक्कम तीनपट शास्ती आणि दंडाची रक्कम आहे. या रकमेत 2 हजार 270 मोबाईल टॉवरची सुमारे 2200 कोटी रुपये थकबाकी आहे. हा वाद न्यायालयात आहे. शासनाच्या कार्यालयांची 106 कोटी रुपये, न्यायालयीन वादातील मिळकतींची सुमारे 800 कोटी रुपयांची थकबाकी आहे. तसेच 4 हजार 400 मिळकतींची दुबार नोंद झालेली आहे. न्यायालयीन वादात असलेल्या 700 खटल्यांमध्ये एक वर्षांहून अधिक काळापासून स्थगिती आहे. ही स्थगिती उठविण्यासाठी आणि केसेस निकाली काढाव्यात यासाठी विशेष जिल्हा न्यायाधीशांना विनंती करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

प्रामुख्याने न्यायालयात कुठलाही वाद नसताना मोठ्या प्रमाणावर थकबाकी असलेल्या सुमारे 12 हजार 500 मिळकतींवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. यापैकी बहुतांश मिळकती या व्यावसायिक आहेत. या मिळकतींना वेळोवेळी नोटिसादेखील बजावण्यात आल्या असून, लवकरच त्या सील करून लिलाव करण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल. मागील वर्षी तब्बल 2500 मिळकती सील केल्यानंतर त्यांच्याकडून सुमारे 180 कोटी रुपये थकबाकी वसुल करण्यात यश आले आहे. या वर्षी ही कारवाई अधिक गतीने आणि व्यापक स्वरूपात करण्यात येईल. यासाठी आवश्यक मनुष्यबळदेखील मिळकतकर विभागाला उपलब्ध करून देण्यात येईल, असे विक्रम कुमार यांनी नमूद केले.

पीटी 3 फॉर्म फक्त 'त्यांनी'च भरून द्यायचा आहे
महापालिकेने 2019 पासून नवीन करआकारणी केलेल्या मिळकतींची 40 टक्के सवलत काढून घेतली आहे. तसेच जीआयएस मॅपिंग सर्व्हेमध्ये ज्या जुन्या मिळकतींची आकारणी झाली त्यांची ही सवलत काढून घेतली आहे. अशा साधारण 1 लाख 65 हजार मिळकतधारकांना 2019 पासून पुन्हा 40 टक्के सवलत देण्यात येणार आहे. केवळ याच मिळकतधारकांनी पीटी 3 फॉर्म भरून द्यायचा आहे.
                          – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त तथा प्रशासक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news