पुणे : पुढारी वृत्तसेवा : सण-उत्सवाची रेलचेल…सांस्कृतिक-धार्मिक कार्यक्रमांचा आनंद…अशा आनंददायी, उत्साही वातावरणात गुरुवारपासून (दि.17) श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. अधिक श्रावण महिन्यानंतरच्या या श्रावण महिन्याचे स्वागत करण्यासाठी घरोघरी आणि मंदिरांमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. श्रावणात पाऊस बरसण्यासह सणासुदींच्या रेलचेलीतून आसमंत चैतन्यदायी आणि प्रफुल्लित होणार आहे. श्रावणी सोमवार, मंगळागौर पूजनासह हा महिना सण-उत्सवांचा असणार आहे. नागपंचमी, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जयंती… अशा सणासुदीच्या रेलचेलीतून सगळीकडे आनंद बहरणार आहे. याशिवाय वास्तूशांती, भूमिपूजन, नवीन व्यवसायाला सुरुवात, नवीन वस्तू खरेदीचे मुहूर्तही गाठता येणार आहे.