

राहू; पुढारी वृत्तसेवा: तुर्कस्तानची बाजरी चक्क दौंड तालुक्यातील बोरीऐंदी येथील माळरानावर बहरू लागली आहे. निवृत्त लष्करी जवान अनिल संपत होले यांनी 22 गुंठे शेतीमध्ये तुर्कस्तान येथून बाजरीचे बी मागवून त्याची पेरणी करीत सेंद्रिय पद्धतीने बाजरीचे उत्पादन घेतले आहे. भारतीय लष्करामध्ये कमांडो म्हणून कार्यरत असलेले होले यांनी स्वेच्छानिवृत्ती घेत सन 2007 सालापासून शेती करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून ते शेतीमध्ये सातत्याने नावीन्यपूर्ण प्रयोग राबवीत असतात.
लष्करातील त्यांचे मित्र व सध्या तुर्कस्तान येथे नोकरीनिमित्त कार्यरत असलेले धर्मेश सिंग या माजी सैनिकाकडून त्यांनी कुरिअरद्वारे 'तुर्केश' या तुर्कस्तानी बाजरीचे बी मागविले होते. एक हजार रुपये किलो दराचे बी पाचशे रुपये कुरिअर खर्च आल्याचे होले यांनी सांगितले. बोरीऐंदी येथील माळरानावर असलेल्या शेतामध्ये बाजरीची पेरणी केली होती.
जवळपास 12 ते 15 फूट उंच या बाजरीची वाढ होत असून, बाजरीचे कणीस सुमारे दोन ते तीन फुटांपेक्षा जास्त लांबीचे आहे. एकरी पंचवीस ते तीस क्विंटल सरासरी बाजरीचे उत्पादन अपेक्षित आहे. यंदा परिसरामध्ये पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे बाजरीला कमी उतारा मिळण्याची शक्यता शेतकरी होले यांनी बोलून दाखवली.
कुठल्याही रासायनिक खतांची मात्रा न टाकता पूर्णपणे 'झिरो बजेट'मध्ये सेंद्रिय पद्धतीने बाजरी पीक आणल्याचे होले यांनी सांगितले. तुर्कस्तान येथून आलेले हे बाजरीचे बियाणे वर्षभर केव्हाही पेरता येत असून, बाजरीच्या सरमाडापासून जनावरांसाठी कुट्टीही होत असल्याचे त्यांनी सांगितले. श्री दुर्गा शेतकरी बचत गटाचे सदस्य सुशांत दरेकर, सचिन भगत, हेमंत भगत, अतुल बोराटे, कृषी सहायक विनायक जगताप, पद्मनाभ कुतवळ आदींनी बाजरी पिकांची पाहणी करीत शेतकरी अनिल होले यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले.