बिबट्याने केली कुत्र्याची शिकार; शिंदे वस्तीतील नागरिक भयभीत

file photo
file photo
Published on
Updated on

हिंजवडी : नेरे-दत्तवाडीतील शिंदे वस्ती येथे संभाजी जाधव यांच्या राहत्या घराच्या पार्किंगमध्ये बांधलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्याचा मृत्यू झाला असून पुन्हा एकदा बिबट्याच्या दहशतीने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. नेरे येथील शिंदे वस्ती येथे शेतकरी संभाजी बबन जाधव यांनी नेहमीप्रमाणे कुत्र्याला साखळीच्या सहाय्याने दारासमोर बांधले होते. पहाटे साडेतीनच्या सुमारास कुत्रा झोपेत असताना अचानकपणे दबा धरून बिबट्याने त्या कुत्र्यावर हल्ला करत फरफटत नेले.

त्यामुळे गावातील नागरिक भयभीत झाले आहेत. विशेष म्हणजे गेली काही महिन्यांपासून या परिसरात बिबट्याचा वावर असूनही यावर ठोस उपाययोजना वनविभागामार्फत करण्यात आलेली नाही. उलट घराला कंपाऊंड बांधून घ्या, असा फुकटचा सल्ला वन विभागाच्या कर्मचार्‍याने शेतकरी जाधव यांना दिला आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग व स्थानिक नागरिक संताप व्यक्त करत आहेत. सध्या उसाची तोड झाल्याने बिबट्या वाडीवस्तीवर, लोकवस्तीत घुसत आहे.

त्यामुळे नेरे, जांबे, कासारसाई या गावांतील नागरिकांना भीतीच्या सावटाखाली राहावे लागत आहे. याकडे वनविभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. शेतकरी आणि नागरिक यासंबंधी वेळोवेळी मागणी करत आहेत. मात्र, कायदा आणि नियमांची यादी वाचत वनविभाग बगल देत आहे.

परिसरात मागील अनेक महिन्यांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. वेळोवेळी माहिती देऊनदेखील वनविभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. शेतकर्‍यांना रात्री-अपरात्री उसाला पाणी देण्यासाठी शेतात जावे लागते. तसेच अनेक शेतकर्‍यांच्या घरी शेळ्या, कुत्रे, लहान वासरे आहेत. त्यांच्यावर हल्ल्याचे प्रमाण मागील काही महिन्यांत वाढले आहे.

                                     -राजाभाऊ जाधव, माजी सरपंच, नेरे

नेरे-कासारसाई येथील शिवारात मागील वर्षी बिबट्याचे बछडे आढळले होते. आता पूर्ण वाढ असलेल्या दोन बिबट्यांचे येथे वारंवार दर्शन घडते आहे. यामुळे सर्वसामान्यांना शेतात जाताना भीती वाटते. येथे उसाचे क्षेत्र अधिक असल्याने बिबट्या जवळ असला तरीही दिसत नाही.

                                                    – ग्रामस्थ

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news