बिबट्याने भेदले सात फुटांचे कुंपण अन् दरवाजा; टाकळी हाजी येथे शेळीवर हल्ला

हीच संरक्षक भिंत आणि त्यावरील काटेरी कुंपण भेदून बिबट्याने बंगल्याच्या परिसरात प्रवेश केला.
हीच संरक्षक भिंत आणि त्यावरील काटेरी कुंपण भेदून बिबट्याने बंगल्याच्या परिसरात प्रवेश केला.

टाकळी हाजी; पुढारी वृत्तसेवा : टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील पोपट अंतू घोडे यांच्या शेळीवर बिबट्याने शनिवारी (दि. 19) मध्यरात्री हल्ला केला असून, यामध्ये शेळी मोठ्या प्रमाणात जखमी झाली आहे. घोडे यांच्या घराला सात फूट उंचीचे कुंपण केलेले असून, दरवाजा पाच फूट उंचीचा आहे. ते भेदून बिबट्याने हल्ला केला.

बिबट्याने कुंपणावरून झेप घेत आत प्रवेश करून शेळीवर हल्ला केला. त्या आवाजाने घोडे यांच्या कुत्र्याने घराच्या दरवाजाला जोरात धडक मारल्याने घोडे यांच्या कुटुंबीयांनी बाहेर येऊन पाहिले असता बिबट्या शेळीवर हल्ला करत असल्याचे दिसून आले. त्यांनी आरडाओरडा करताच बिबट्याने त्यांच्यासमोर गेटवरून उडी मारत धूम ठोकली.

या हल्ल्यात शेळीचा जबडा खाल्ला असून शेळीच्या अंगावर मोठ्या प्रमाणात जखमा झालेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्याच परिसरात बिबट्याच्या बछड्याचा उपासमारीने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मात्र ही टाकळी हाजी परिसरातील नागरिकांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. शिकार न मिळाल्यामुळे थेट मानव वस्तीतच प्रवेश करून पशुधनावर बिबट्याचे हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या परिसरात वनविभागाने तत्काळ पिंजरे लावण्याची मागणी बाबाजी घोडे, सावकार घोडे, गणेश घोडे यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news