

मंचर : लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारांनी सोशल मीडियाबरोबर मतदारांच्या गाठी-भेटीवर कोपरा सभावर भर दिला आहे. उमेदवार व त्याचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन बैठका घेत आहेत. सर्वत्र निवडणुकीचा धुरळा पहावयास मिळत आहे. मात्र, गावातील चौकात, पारावर गावातील ज्येष्ठ मंडळी जुन्या काळातील निवडणुकीच्या आठवणींना उजाळा देतात, गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी असे म्हणत पूर्वीच्या काळी दिवसभर प्रचार झाल्यानंतर भेळ, चहा, वडापाव यावर समाधान मानणारे निष्ठावंत कार्यकर्ते होते. मात्र, आताचे कार्यकर्ते मोठ्या हॉटेलमध्ये जात आहेत. त्यामुळे पूर्वीच्या काळी भेळ, चहा, वडापाव याच्यावर होणारा प्रचार दुर्मीळ झाल्याचे पहावयास मिळत आहे.
सन 1970 ते 80 च्या दशकात प्रचाराची रणधुमाळी काही वेगळीच होती. अंगात साध्या पद्धतीचा पोशाख, जुन्या जीप गाडीतून प्रचार केला जायचा. कार्यकर्त्यांसाठी टेम्पो किंवा वर्हाडाचा टेम्पो याची सोय केली जायची, कार्यकर्ते टपावर बसून प्रचार करायचे, उमेदवार घरोघरी जाऊन कार्यकर्त्यांना, महिलांना गोळा करत असत. प्रचाराची गाडी गावोगावी प्रचार करत जायची, गाडीत ढोल-लेझीम असायचे, गावागावात नेत्यांच्या घोषणा दिल्या जायच्या, सुट्टीच्या दिवशी शाळा, कॉलेजची मुलेही प्रचारात सहभागी होत असत. गावात गेले की, उमेदवाराच्या ओळखीच्या कार्यकर्त्याच्या घरी सर्व कार्यकर्ते जमून घरासमोर बैठक घेऊन तिथे चहापाणी व्हायचे. घरातील महिला उमेदवाराला औक्षण करायच्या, एखाद्या सधन घरात अनेकदा खाण्या-पिण्याची सोय केली जायची आणि कार्यकर्ते घरूनच डबा घेऊन जायचे.
दिवसभर प्रचार करून दमलेल्या कार्यकर्त्यांसाठी सायंकाळी एखाद्या हॉटेलवर मुरमुरे, फरसाण, भेळीची जय्यत तयारी केली जायची, पोटभर भेळ खाऊन, चहा घेऊन कार्यकर्ते दुसर्या दिवशीचे प्रचाराचे नियोजन करायचे, असे आजही ज्येष्ठ नागरिक सांगतात.
गेल्या काही वर्षांत प्रचाराचे रूप बदलले असून आता उमेदवार हायटेक प्रचार करत आहेत. कार्यकर्त्यांसाठी महागड्या गाड्या, सकाळी नाश्त्याची सोय, दुपारी जेवण, रात्री शाकाहारी, मांसाहारीच्या पंगती उठत आहेत. कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार त्यांना विविध सोयीसुविधा पुरविल्या जात आहेत. पूर्वीच्या काळी निष्ठावंत कार्यकर्ते कुठली अपेक्षा न ठेवता प्रचार करत होते. मात्र, आता उमेदवारांनी एखादी अपेक्षा पूर्ण न केल्यास कार्यकर्तेही प्रचारात येत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
पूर्वीच्या काळी उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी गावोगावी ढोल, लेझीम, सनई, तुतारी आदी पारंपरिक वाद्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असे, तसेच उमेदवार निवडून आल्यानंतर गावातून काढण्यात येणार्या मिरवणुकीत ढोल पथक, झांज पथक, बेंजो या पारंपरिक गोष्टींचा वापर केला जात असे, कार्यकर्त्यांना फेटे बांधून गुलाल- भंडार्याची उधळण करत ढोल-ताशांच्या गजरात जंगी मिरवणूक काढली जात असे. मात्र गेल्या काही वर्षांत या जुन्या परंपरा गायब झाल्या असून आता उमेदवाराच्या प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. विविध रिल्स, व्हिडिओ, युट्युब चॅनेल, फेसबुक, व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रचारावर भर दिला जात आहे.
सध्या भरउन्हाळ्यात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. पक्षाचे विविध उमेदवार गावोगावी जाऊन प्रचार करत आहेत. सोशल मीडिया, फेसबुक, व्हॉट्सअप या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू आहे. मात्र उन्हात दुपारच्या वेळी अनेक कार्यकर्ते कडक ऊन असल्याने प्रचार करण्यास टाळाटाळ करत आहेत. कार्यकर्त्यांकडून प्रचारासाठी बिसलेरी थंड पाणी, एसी गाड्यांची मागणी होत आहे. त्यामुळे उमेदवारही कार्यकर्ता नाराज होऊ नये म्हणून त्यांना एसी गाड्यांची सोय करून देत आहे. पूर्वीच्या काळी उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी मिळेल ते वाहन घेऊन कार्यकर्ते प्रचार करत होते. अनेक कार्यकर्ते तर सायकलवर गावोगावी जाऊन आपल्या उमेदवाराचा प्रचार करत असत, असे ज्येष्ठ कार्यकर्ते सांगत आहेत.
हेही वाचा