कामशेत : येथील पुणे-मुंबई महामार्गावर बांधलेल्या पुलामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. या पुलामुळे वाहनचालकांची जास्त गैरसोय होत आहे. त्यामुळे चालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे कामशेत येथील पुलाची असून सोय नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे.
हा पूल कोणत्या न कोणत्या कारणांमुळे नेहमी चर्चेत राहिला आहे. हा पूल तयार होण्यास तब्बल चार ते पाच वर्षे लागली होती. तरीही याचे काम निकृष्ट दर्जाचे
झाल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुलाचे काम सुरू असताना अनेक वेळा अपघात झाले आहेत. त्यामुळे एका अपघातप्रकरणी कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होता. या पुलामुळे वाहतूक कोंडी कमी होण्याएवजी यामध्ये वाढच झाली आहे.
हा पूल अरुंद असल्याने याचा बोगदाही अरुंद आहे. पुलाखालून वाहनांना वळण घेताना चालकांना कसरत करावी लागते. तर, काही चालक बेशिस्तपणे वाहन चालवित असल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. पोलिसांना वाहतूककोंडी सोडविताना नाकीनऊ येत आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही समस्या सोडवून वाहतूक कोंडीतून सुटका करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.
कामशेत पुलाखाली वाहतूक कोंडी होत असते. यावर संबंधित पोलिस अधिकारी, ग्रामपंचायत व एमएसआरडीसीचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.
– आर. एस. सोनवणे, अभियंता, एमएसआरडीसी
कामशेत शहराच्या जवळून जाणारा जुना पुणे-मुंबई महामार्गावर सतत वाहतूक कोंडी होत आहे. याचा त्रास स्थानिकांना सहन करावा लागतो. यातच महामार्गावरील कामशेत येथे चुकीच्या पद्धतीने पूल तयार करण्यात आला आहे. या पुलाच्या एका बाजूने वाहने चालविता येत नसल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्याच्याकडेला अतिक्रमण झाल्याचा परिणामही वाहतुकीवर होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही समस्या सोडवावी.
– संतोष वंजारी, नागरिक, कामशेत
हेही वाचा