रावणगाव : एटीएम पळविण्यासाठी वापरलेली जीप चोरीची

रावणगाव : एटीएम पळविण्यासाठी वापरलेली जीप चोरीची
Published on
Updated on

रावणगाव; पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील सुपे येथून चोरट्यांनी तब्बल 7 लाख 14 हजार रुपये रक्कम असलेले एटीएम मशिन पळविले. यासाठी वापरण्यात आलेली जीप (एमएच 13 जीव्ही 8077) सासवड येथून चोरल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. ही जीप रावणगाव पोलिसांना पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर खडकी हद्दीत सापडली. दौंडचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे यांनी ही माहिती दिली.

सुपे येथील इंडिकॅश कंपनीचे एटीएम मशिन गॅसकटरने तोडून चोरट्यांनी शुक्रवार (दि. 10) पळविले. चोरटे जीपमधून पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून रावणगाव-बोरीबेल रस्त्यावरील वणगाव-बोरीबेल घाटात आले. तेथे त्यांनी एटीएम मशिन गटारात लपविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार ग्रामस्थांनी बघितला. त्यामुळे चोरट्यांनी एटीएम तेथेच चाकून पळ काढला. चोरट्यांनी एटीएम मशिन चोरीसाठी वापरलेली जीप रावणगाव पोलिसांना शनिवारी (दि. 11) सकाळी अकरा वाजता सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर खडकी हद्दीत सापडली.

रावणगाव पोलिस चौकीचे हवालदार गोरख मलगुंडे यांनी सदर जीप ताब्यात घेतली. दौंड पोलिसांनी जीप तपासासाठी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिली. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे म्हणाले की, दौंड पोलिसांकडून या गुन्ह्यात
वापरलेली जीप ताब्यात घेतली आहे. चोरट्यांनी सासवड येथून ही गाडी चोरली होती. याबाबत सासवड ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. एटीएम चोरीचा छडा लावून आरोपींना जेरबंद केले जाईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news