पुणे : आग लागलेल्या हॉटेलवर झाली होती कारवाई

पुणे : आग लागलेल्या हॉटेलवर झाली होती कारवाई

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लुल्लानगर येथील सातव्या मजल्यावरील हॉटेलला आग लागल्यानंतर पुन्हा एकदा शहरातील टेरेसवरील रेस्टॉरंट आणि हॉटेलचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ज्या हॉटेलला आग लागण्याची घटना घडली, त्या हॉटेलवर महापालिकेने 2019 मध्ये कारवाई केली होती. त्यानंतर पुन्हा हे हॉटेल सुरू करण्यात आले. त्यानंतर तीन महिन्यांपूर्वी नोटीसही देण्यात आल्याची माहिती महापालिका अधिकार्‍यांनी दिली आहे. काही महिन्यांपूर्वी बाणेर येथे एका इमारतीच्या टेरेसवर बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या हॉटेलला आग लागली होती. या घटनेनंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाने शहरातील टेरेस हॉटेल व रेस्टॉरंटचा सर्व्हे करून 82 हॉटेलचालकांना नोटीस बजावली होती. काहींनी कारवाईच्या भीतीने बांधकामे उतरविली, तर काहींनी बेकायदेशीरपणे व्यवसाय सुुरूच ठेवला होता.

महापालिकेने पाठविलेल्या नोटिशीनंतरही हॉटेल व्यवसाय सुरू ठेवणार्‍या 35 हॉटेल व रेस्टॉरंटवर कारवाई करून तेथील अनधिकृत शेड, बांधकामे पाडली होती. ही कारवाई झाल्यानंतरही काहींनी पुन्हा हॉटेल व रेस्टॉरंट थाटून व्यवसाय सुरू केला आहे. या प्रकारांना रोखण्यासाठी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशाराही दिला होता. त्यानुसार 8 जणांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे.

दरम्यान, लुल्लानगर येथील ज्या हॉटेलमध्ये मंगळवारी आगीची घटना घडली, त्या हॉटेलवर महापालिकेच्या बांधकाम विभागाने कारवाई केली होती. त्यानंतर हे हॉटेल पुन्हा सुरू करण्यात आले. बाणेर येथील आगीच्या घटनेनंतर या हॉटेलला नोटीस दिली होती, असे महापालिकेच्या बांधकाम विभागाचे अधाक्षक अभियंता सुधीर कदम यांनी सांगितले.

कारवाईसाठी हवा पोलिस बंदोबस्त
अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाला पोलिस बंदोबस्त आवश्यक असतो. गणेशोत्सवापूर्वी महापालिकेने 35 हॉटेल्सवर कारवाई केली. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी या सणांच्या कालावधीत पोलिस बंदोबस्त उपलब्ध होत नाही. त्यातच महापालिकेच्या पोलिसांना इतर पोलिसांप्रमाणे अधिकार नाहीत. त्यांना गुन्हा दाखल करण्याचा किंवा अटक करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे अनधिकृत हॉटेलवरील कारवाई थांबल्याने पुन्हा पोलिस बंदोबस्त देण्याची मागणी केली जात आहे.

इतर खात्यांतही हवा समन्वय

महापालिकेने अनधिकृत बांधकाम पाडल्यानंतर काही व्यावसायिकांनी न्यायालयाकडे दाद मागून कारवाईला स्थगिती मिळविली आहे. तर, नोटीस पाठविलेल्यांपैकी सहा जणांकडे परवानगी असल्याचे आढळून आले आहे. महापालिकेचा बांधकाम विभाग, महसूल विभाग, महावितरण, अन्न व औषध प्रशासन या खात्यांमध्ये समन्वय निर्माण झाला, तर टेरेसवरील अनधिकृत हॉटेल व्यवसायाला आळा बसू शकतो.
शहरातील टेरेस
हॉटेलबाबतचे वास्तव
शहरातील टेरेसवरील हॉटेलची
संख्या : 82
नोटीस दिलेल्या हॉटेलची संख्या : 82
कारवाई करण्यात आलेल्या हॉटेलची संख्या : 39
न्यायालयाची स्थगिती : 5
कारवाई प्रलंबित : 35

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news