निगडीतील खाऊ गल्ली गुंडाळली ! सुविधा न दिल्याने महापालिकेचा उपक्रम दीड महिन्याभरात रद्द

निगडीतील खाऊ गल्ली गुंडाळली ! सुविधा न दिल्याने महापालिकेचा उपक्रम दीड महिन्याभरात रद्द

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांच्या संकल्पनेतून निगडीतील उड्डाणपुलाखाली रस्त्यांवरील विक्रेत्यांचे पुनर्वसन करून खाऊ गल्ली सुरू करण्यात आली. मात्र, केवळ दीड महिन्यात ही खाऊ गल्ली बंद करण्यात आली आहे. पालिका प्रशासनाच्या धर सोड वृत्तीमुळे हा उपक्रम बंद झाल्याने विक्रेत्यांची फरफट सुरू झाली आहे.
निगडीतील टिळक चौक, सावली हॉटेल व परिसरात रस्ते व पदपथावर खाद्यपदार्थ विक्री करणार्‍या हातगाडी विक्रेत्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. त्यासंदर्भात अनेक तक्रारी पालिका व क्षेत्रीय कार्यालयास प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे तेथील विक्रेत्यांचे निगडी उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेथे खाऊ गल्ली सुरू करण्यास तत्कालीन आयुक्त पाटील यांनी मान्यता दिली. तेथे घाईघाईत खाऊ गल्ली तयार करून त्याचे आयुक्त पाटील यांच्या हस्ते 17 ऑगस्टला उद्घाटनही करण्यात आले.

आयुक्त पाटील यांची बदली होऊन, आता शेखर सिंह हे नवे आयुक्त रूजू झाले आहेत. आयुक्तांची बदली झाल्याने जुनी धोरणे बदलली जात असल्याचे चित्र आहे. वीज, पाणी, सुरक्षारक्षक, स्वच्छतागृह आदी सुविधा नसल्याचे कारण देत ती खाऊ गल्ली अचानक बंद करण्यात आली. 'अ' क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने खाऊ गल्ली दोन दिवसांपूर्वी बंद करण्यात आली. त्यामुळे तेथील 30 ते 35 विक्रेते पुन्हा रस्त्यांवर आले आहेत. ते रस्ता व पदपथावर व्यवसाय करीत असल्याने वाहतुक कोंडीची समस्या पुर्वीप्रमाणे निर्माण झाली आहे.
पालिका प्रशासनाच्या धर सोड धोरणामुळे सुरू झालेली खाऊ गल्ली दीड महिन्यातच बंद झाल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. तसेच, विक्रेतेही पालिकेच्या या वृत्तीबाबत प्रचंड नाराजी व्यक्त करीत आहेत.

पालिकेकडून विक्रेत्यांची फसवणूक
निगडी उड्डाणपुलाखाली पालिका प्रशासनाने सोई-सुविधा दिल्या नाहीत. त्यासाठी 20 सप्टेंबरला आंदोलन करण्यात आले. वेळेत सुविधा न दिल्याने हे विक्रेते पुन्हा रस्त्यांवर आले आहेत. सुविधा देणे दूरच तेथे साफसफाईकडेही दुर्लक्ष केले जात होते. पालिका प्रशासनाने फसवणूक केली आहे, असे विक्रेते इरफान चौधरी यांनी सांगितले.

अधिकार्‍यांमध्ये समन्वयाचा अभाव
वाहतुकीची समस्या सुटावी. विक्रेत्यांना हक्काची जागा मिळावी म्हणून उड्डाणपुलाखाली पालिकेची परवानगी घेऊन खाऊ गल्ली सुरू करण्यात आली. पालिकेच्या अधिकार्‍यांमध्ये समन्वय नसल्याने पथारी, हातगाडीधारकांची हेळसांड होत आहे. ही बाब निषेधार्थ आहे, कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी सांगितले.

ठराविक विक्रेत्यांना प्राधान्य
उड्डाणपुलाखालील खाऊ गल्लीत मर्जीतील विक्रेत्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. ठराविक रक्कम देता आली नाही, त्या विक्रेत्यांना तेथे जागा देण्यात आली नाही. तेथे पाणी, वीज, शौचालय, साफसफाई आदी सुविधा नाहीत. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. खाऊ गल्ली सुरू करण्यासाठी घाई करण्यात आली. त्यात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी केली जावी, अशी तक्रार काही संघटनांनी केल्या आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news