पुणे : आठवड्यात 850 बालकांना दिला गोवरचा पहिला डोस

पुणे : आठवड्यात 850 बालकांना दिला गोवरचा पहिला डोस
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गोवर उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर राज्यात विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. याअंतर्गत 7 डिसेंबरपर्यंत 17 हजार 310 बालकांना गोवर रुबेलाचा पहिला डोस, तर 9 हजार 865 बालकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. शहरात गेल्या आठवडाभरात 850 बालकांना पहिला, तर 1050 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

गोवरवर नियंत्रण मिळवण्यासाठी उद्रेक प्रतिसाद लसीकरण सुरु करण्यात आले आहे. त्यासाठी विशेष लसीकरण सत्रे घेण्यात येत आहेत. नियमित मोहिमेमध्ये 9 ते 12 महिन्यांदरम्यान गोवर रुबेला लसीचा पहिला डोस, तर 16 ते 24 महिने या कालावधीत बालकांना दुसरा डोस दिला जातो.

सध्या 9 महिने ते 5 वर्षे या वयोगटातील जिल्हा आणि मनपानिहाय यादी करण्यात आली आहे. संवेदनशील भागांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये राज्यात 2952 विशेष लसीकरण सत्रांमार्फत 1 लाख 46 हजार 115 बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

गोवर आणि रुबेला लसीकरणाच्या विशेष मोहिमा राबवल्या जात असताना पुरेसे डोस उपलब्ध होतील, याबाबतही काळजी घेण्यात येत आहे. सध्या जिल्हा स्तरावर 11 लाख 55 हजार 570 तर विभागीय स्तरावर 1 लाख 19 हजार 250 डोस, राज्य स्तरावर 79 हजार डोस असे एकून 13 लाख 53 हजार 820 डोस उपलब्ध आहेत, असे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.

जिल्ह्यातील गोवरची स्थिती
एप्रिल ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत जिल्ह्यात गोवरचे 687 संशयित रुग्ण आढळून आले. त्यापैकी 22 जण पॉझिटिव्ह आढळून आले. या कालावधीत जिल्ह्यात 1 लाख 7 हजार 880 जणांना गोवर रुबेला लसीचा पहिला डोस, तर 91 हजार 618 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. पहिल्या डोसचे 107 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले असून, दुस-या डोसचे 53 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.

पुणे महापालिका हद्दीत 28 नोव्हेंबरपासून 850 बालकांना पहिला, तर 1050 बालकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. महापालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये दररोज, तर बाह्य रुग्ण विभागात आठवड्यातून दोनदा गोवर रुबेला लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. संशयित रुग्णांच्या परिसरात जागच्या जागी लसीकरण करण्यात येत आहे.
                                                    – डॉ. सूर्यकांत देवकर,
                                        लसीकरण अधिकारी, पुणे महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news