पुणे : पुढारी वृत्तसेवा : सोमवारी मतदान अगदी शेवटच्या टप्प्यात आलेले असतानाच शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे काही मतदान केंद्रांवर तारांबळ उडाली. सुमारे अर्ध्या तासात पुन्हा रस्त्यावर पाणीच पाणी झाले. मात्र, या पावसाची वेधशाळेने नोंद घेतली नाही. गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी शहरात धो धो पावसाने बहार आणली. रविवारी पावसाने विश्रांती घेतली त्यामुळे सोमवारी पाऊस येईल की नाही, अशी शंका होती. सोमवारी 13 मे रोजी शहरात सकाळपासून अंशतः ढगाळ वातावरण होते, मात्र दुपारनंतर कडक उन्हाचा तडाखा जाणवू लागला.
त्यानंतर दुपारी 1 ते सायंकाळी 6 पर्यंत पावसाची शक्यता दिसत नव्हती. मात्र, 6 वाजून 15 मिनिटांनी आकाश काळ्याभोर ढगांनी दाटून आले अन् धो धो पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे मतदान केंद्रावरील रांगा लावून असलेल्या ठिकाणी मतदारांची एकच धावपळ झाली. सायंकाळी 6 ला मतदान केंद्रात आलेल्यांना रांगेत घेऊन ते पूर्ण करण्याचे काम सुरू होते. मात्र, पावसामुळे मतदारांना सुरक्षित जागी आडोसा घ्यावा लागला.
अनेक ठिकाणी पावसामुले तळे साचले. सहा वाजता सुरू झालेला पाऊस साडेसहा ते सातपर्यंत सुरू होता. शहरापेक्षा उपनगरांत जास्त पाऊस सुरू होता. पावसाचा जोर इतका होता की पुन्हा एकदा सर्व रस्ते जलमय झाले. गार वारा सुटला. मात्र, या पावसाची नोंद वेधशाळेने घेतली नाही. शिवाजीनगर, कर्वे रस्ता, कात्रज, कोथरूड, बाणेर, पाषाण, मगरपट्टा, नगर रस्ता या भागांतील रस्त्यांवर पाणी जोराने वाहत होते.
हेही वाचा