कोथरूड विधानसभा मतदारसंघासाठी महायुती, महाविकास आघाडी आणि मनसेच्या उमेदवारांची घोषणा झाल्याने येथील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघात आजी-माजी आमदारांमध्ये लढत रंगणार असून मनसे उमेदवार त्यात कशा पद्धतीने आपला रंग भरणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कोथरूड विधानसभा मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपच्या तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाट्याला आला आहे. भाजपमधून विद्यमान आमदार व राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह माजी नगरसेवक अमोल बालवडकर इच्छुक होते. मात्र, पक्षाने चंद्रकांत पाटील यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. त्यामुळे नाराज बालवडकरांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार घेणार नाही, असे म्हणत पाटील यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरून आपला प्रचारही सुरू केला आहे. भाजपने उमेदवार जाहीर करण्यात आणि प्रचारात बाजी मारली आहे.
दुसरीकडे आघाडीच्यावतीने शिवसेनेने येथील उमेदवार जाहीर करण्यास इतर पक्षाच्या तुलनेत खूपच वेळ घेतला. शिवसेनेकडून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि महापालिकेतील माजी गटनेते पृथ्वीराज सुतार इच्छुक होते. या दोघांपैकी कोणाला उद्धव ठाकरे संधी देणार याबाबत मतदारांमध्ये उत्सुकता वाढली होती. अखेर रविवारी शिवसेनेने माजी आमदार मोकाटे यांना मातोश्रीवर बोलावून घेऊन थेट एबी फॉर्म देण्यात आला. त्यामुळे कोथरूडमध्ये आजी- माजी आमदारांमध्ये लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप व महायुतीसोबत असलेल्या मनसेने कोथरूडमध्ये आपला स्वतंत्र उमेदवार उभा केला आहे. मनसेने गतनिवडणुकीत चंद्रकांत पाटील यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केलेले माजी नगरसेवक अॅड. किशोर शिंदे यांना रिंगणात उतरवले आहे. शिंदे यांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मेट्रोने प्रवास करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिंदे यांनी प्रचार सुरू केला आहे. आजी- माजी आमदारांच्या लढाईत मनसेचे इंजिन किती वेगाने धावणार, हे पाहावे लागणार आहे. दुसरीकडे परिवर्तन आघाडी व इतर पक्ष कोणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवतात, हे दोन दिवसानंतर स्पष्ट होणार आहे.