

पुणे : पुढारी वृत्तसेवा : प्रथम मुहूर्त नवचैतन्याचा, गुढीपाडवा सण मराठी नववर्षाचा… अशा शब्दांमधून एकमेकांना मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत घराघरांमध्ये गुढीपाडव्याचा सण बुधवारी आनंदात, उत्साहात साजरा करण्यात आला. गुढीपाडव्याला नवसंकल्पाची, नवकार्याची, नवचैतन्याची अन् मांगल्याची गुढी उभारण्यात आली. उत्साहाने, आनंदाने, पारंपरिक वेशभूषेत सहकुटुंब गुढी उभारून प्रत्येकाने नवलाईने नववर्षाचे स्वागत केले अन् एकमेकांना नवीन वर्षाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. अनेकांनी सोन्याचे दागिने, वाहन, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह नवीन घर खरेदीचे निमित्त साधले.
पहाटेचे मंगलमय वातावरण, मठ-मंदिरांत देवी-देवतांची धार्मिक परंपरेनुसार पूजा-अर्चा, देवी-देवतांच्या मूर्तींना भरजरी वस्त्रे आणि आभूषणे परिधान करून नैवेद्यही दाखविण्यात आला. घरोघरी तसेच सार्वजनिक ठिकाणी गुढी उभारून नववर्षाचे उत्साहात, आनंदात स्वागत करण्यात आले. यानिमित्त मिरवणुकांचेही आयोजन करण्यात आले. मंदिरांमध्येही यानिमित्त मंगलमय वातावरण रंगले होते. सकाळपासूनच मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. मंदिरांमध्येही परंपरेनुसार गुढी उभारण्यात आली. मंदिरात विद्युतरोषणाई आणि फुलांची सजावट अन् रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या.
मंदिरांमध्ये भजन-कीर्तनासह प्रवचन, व्याख्यानांचे आयोजन केले होते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त सराफाच्या दालनांमध्ये दागिने खरेदी-विक्रीची लगबग पाहायला मिळाली. अनेकांनी नवीन वाहन, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी केल्या. काहींनी नवीन गृहप्रवेशाचे निमित्त साधले. घरोघरी देखील मांगल्याचे प्रतीक असलेली गुढी उभारण्यात आली. यानिमित्त पंचपक्वान्नांचा बेत आखण्यात आला. संस्था-संघटनांनी सामाजिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. सोशल मीडियावरून देखील दिवसभर गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
पुणेकरांनी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत बुकिंग केलेली वाहने मनोभावे पूजा करून आपापल्या घरी नेली. त्यामुळे बुधवारी
(दि. 22) शहरातील वाहन विक्रीच्या दुकानांबाहेर नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. गेल्या पंधरा दिवसांतच पुणेकरांनी तब्बल 11 हजार वाहनांचे बुकिंग केले होते. ती बुक केलेली वाहने पुणेकरांनी आपल्या कुटुंबीयांसोबत शोरूमला येऊन घरी नेली. या वेळी वाहनांची मनोभावे पूजा तर झालीच, मात्र दुकानदारांनी पेढ्यांचा आस्वाद देखील घेतला. दिवसभर वाहने घरी नेण्यासाठी आलेले नागरिक आणि त्यांच्या हातात पेढ्यांचे बॉक्स, असे चित्र पाहायला मिळत होते.
मोबाईल खरेदीसाठी झुंबड
गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत नागरिकांनी वाहनांसोबतच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची देखील खरेदी केली. बुधवारी खासकरून पुणेकरांनी मोबाईलच्या दुकानांत मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे दिसले. यात जंगली महाराज रस्ता, सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनीजवळ, टिळक रस्ता, मध्यवस्तीतील सर्व पेठांमध्ये आणि उपनगरांतही मोबाईलच्या दुकानांमध्ये गर्दी होती.
सराफ बाजारात खरेदीचा उत्साह
गुढीपाडव्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी आकर्षित योजना जाहीर केलेल्या सराफ बाजाराला सोने खरेदीदारांनी उत्साही प्रतिसाद दिला. सोन्याचे भाव तेजीत असले तरी पारंपरिक दागिने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असल्याचे दिसून आले. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला अनेक जण सोने खरेदी करतात. लग्नसराईच्या अनुषंगाने मंगळसूत्र, बांगड्या तसेच नेकलेस खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल राहिला. सोने खरेदी करणार्यांसाठी घडणावळीवर आकर्षक सूट देण्यासह विविध भेटवस्तूंच्या योजना सराफांनी जाहीर करीत ग्राहकांना आकर्षित केले. त्यामध्ये, सोने खरेदीवर तेवढीच चांदी फ—ी, लकी ड्रॉ कूपन, दागिन्यांच्या घडणावळीवर सूट, पैठणी साडीसह आकर्षक भेटवस्तू ग्राहकांना देण्यात आल्या.
पीएन गाडगीळ अॅन्ड सन्सचे सीईओ अमित मोडक म्हणाले, 'गुढीपाडव्याच्या दिवशी 24 कॅरेट सोन्याचे दर 59 हजार रुपये, तर 22 कॅरेटचे दर 54 हजार 500 रुपये प्रतितोळा असे राहिले. लग्नसराईच्या अनुषंगाने मंगळसूत्र, बांगड्या, नेकलेस आदी दागिन्यांची खरेदी झाली. तर, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हमखास सोने खरेदी करणार्यांनी यंदा वजनाने हलक्या चेन, अंगठ्या तसेच कानातले खरेदी करण्यास पसंती दिली.'