पुणे : आरोग्य विभागाचा चेहरामोहरा बदलणार: आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे आश्वासन

File Photo
File Photo
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अजूनही पूर्णपणे सक्षम झालेली नाही. रुग्णांसाठी पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाहीत, असे विदारक चित्र पहायला मिळात आहे. उणिवा दूर करून पुढील दोन वर्षांत आरोग्य विभागाचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे आश्वासन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिले.

इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशनच्या 'आयफाकॉन' या 66 व्या वैद्यकीय परिषदेचे उद्घाटन प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. या वेळी आरोग्य संचालनालयाचे आयुक्त डॉ. एन. रामास्वामी, भारती विश्वविद्यालयाचे प्र-कुलगुरू आमदार डॉ. विश्वजित कदम, एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेसचे कुलगुरू डॉ. शशांक दळवी, इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय रॉय, डॉ. संघमित्रा घोष, डॉ. गजानन वेल्हाळ, डॉ. मुरलीधर तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.

भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन, महाराष्ट्र यांच्या वतीने 23 ते 25 सप्टेंबरदरम्यान वैद्यकीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. 'डिजिटल टेक्नॉलॉजी फॉर इंपृव्हिंग हेल्थ' ही यंदाच्या परिषदेची थीम आहे.

सावंत म्हणाले, 'आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर माझा भर असणार आहे. आदिवासी वस्ती, दुर्गम भागापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी दहा कलमी कार्यक्रम तयार केला आहे. 'माता सुरक्षित, तर घर सुरक्षित', 104 हेल्पलाईन क्रमांक अशा विविध अभियानांवर काम सुरू आहे. सर्व उपाययोजनांची येत्या सहा महिन्यांत अंमलबजावणी केली जाईल.

' प्रमुख पाहुण्यांनी कोरोनाची दोन वर्षे, आरोग्य यंत्रणेने संकटाशी केलेले दोन हात, लसीकरण आदी विषयांना स्पर्श केला. विश्वजित कदम यांनी भारती विद्यापीठाची पार्श्वभूमी कथन केली. डॉ. वर्षा वैद्य यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. जयश्री गोठणकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

पतंगरावांचा आशीर्वाद नसता तर तानाजी सावंत आज इथे नसते. मी भारती विद्यापीठ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 9 वर्षे प्राध्यापक म्हणून काम केले. पतंगराव कदम यांनी कायम प्रोत्साहन दिले. मी मुळात राजकारणी नाही किंवा मला राजकीय वारसाही नाही. पतंगराव कदम यांचे विचार घेऊन वाटचाल करत राहिलो. गेल्या 50 वर्षांत त्यांच्यासारखा राजकारणी मी पाहिला नाही. पतंगराव कदम हयात असते तर आज नक्कीच ते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत दिसले असते.
                                                              -डॉ. तानाजी सावंत, आरोग्यमंत्री

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news