पुणे : ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी 75 देशांचा सहभाग असणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राचा खेळ जागतिक पातळीवर पोहचला असून, अनेक देशांचा सहभाग वाढला आहे. या विश्वकरंडकामध्ये 55 देशांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे नक्कीच ऑलिम्पिकसाठीची खो-खोची दारे यानिमित्ताने खुली झाली असल्याची भारतीय खो-खो संघाचा कर्णधार प्रतीक वाईकर याने दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली. प्रतीक वाईकर याने दै. ‘पुढारी’शी विशेष मुलाखत दिली.
या विजयाबाबत बोलताना प्रतीक म्हणाला, पहिल्याच विश्वकरंडक स्पर्धेमध्ये भारताच्या मुले आणि मुलींच्या दोन्ही संघांनी करंडकावर नाव कारून भारताला विश्वविजेता बनविले आहे. याचा अधिक आनंद आहे. या विजयाने आशियाई स्पर्धा किंवा कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये आम्हाला प्रवेश मिळणार आहे. पण, ऑलिम्पिक स्पर्धेत खो-खो खेळाचा समावेश व्हावा, अशी अनेक वर्षांपासूनची खेळाडूंची मागणी या विजयाने पूर्ण होताना दिसते. 2036च्या ऑलिम्पिक स्पर्धेत नक्कीच खो-खो या खेळाचा समावेश झालेला असून, त्यामध्येही भारतच विजेता ठरेल, असा विश्वास वाईकर याने व्यक्त केला.
स्पर्धेतील अनुभवाबाबत बोलताना प्रतीक म्हणाला, या पहिल्याच विश्वकरंडकामध्ये 55 देशांचा सहभाग होता. दुसर्या विश्वकरंडकामध्ये तब्बल 100 देश सहभागी होणार आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी 75 देशांचा सहभाग असणे गरजेचे असून, नक्कीच ऑलिम्पिकमध्ये हा खेळ सहभागी होईल. या स्पर्धेतील सहभागी देशांमध्ये नेपाळ आणि दक्षिण आफि—का हे दोन्ही देश खूपच तुल्यबळ होते. त्या दोन्ही संघांतील खेळाडूंचा खेळ उत्तमच होता. मात्र, आपल्याला आपल्या लोकांकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे भारताला यश मिळाल्याचे त्याने सांगितले. संघातील खेळाडूंच्या कामगिरीबाबत प्रतीक म्हणाला, संघातील प्रत्येक खेळाडू कमी पडणार्या खेळाडूची उणीव भरून काढत होता. प्रत्येक खेळाडू हा त्याच ताकदीने आणि संघाला विजय मिळवून देण्याच्या उद्देशाने मैदानात उतरल्याचे दिसले.