

पुणे; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून पुणे जिल्ह्यातील सुमारे 4 लाख 47 हजार 182 पात्र शेतकर्यांना सर्वसाधारणपणे 268 कोटी रुपये मिळत आहेत. पात्र शेतकर्यांना वर्षभरात सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जात असून, त्यामध्ये आता राज्य सरकारकडूनही सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे केंद्र व राज्याचे मिळून वार्षिक 536 कोटी रुपये मिळतील, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
शेतकर्यांना निश्चित उत्पन्नासाठी, बी-बियाणे, खते आदी कृषी निविष्ठांची खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत करणे आणि त्याद्वारे कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची (पीएम किसान) अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबीयांस दोन हजार रुपयांप्रमाणे एकूण तीन हप्त्यांत केंद्र सरकारकडून सहा हजार रुपयांचा प्रतिवर्षी लाभ दिला जात आहे. आता केंद्र व राज्य सरकारचा मिळून दर वर्षाला 12 हजार रुपयांचा एकत्रित लाभ शेतकर्यांना मिळणार आहे.
पुणे जिल्ह्यात नोंदणीकृत शेतकर्यांची संख्या 5 लाख 37 हजार 815 इतकी आहे. त्यापैकी पात्र 4 लाख 47 हजार 182 शेतकर्यांना योजनेचा लाभ मिळत आहे. त्यानुसार केंद्र सरकारच्या योजनेतून योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील शेतकर्यांना 1 हजार 25 कोटी 19 लाख रुपयांइतकी रक्कम मिळाली आहे.
– सुभाष काटकर,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे