पुणे: प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या क्षेत्रात येणार्या सात गावांतील सातबार्यांवर ‘जमीन विमानतळासाठी संपादित’ असे शिक्के मारले जात आहेत. त्याबाबत हरकती नोंदविण्यास 29 मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. नोंदी झाल्यामुळे या जमिनींचे हस्तांतरण आता करता येणार नाही. त्यामुळे भूसंपादनाच्या हालचालींना गती आल्याचे दिसून येते.
भूसंपादनासाठी शेतजमिनीच्या मोजणी विरोधात शेतकर्यांनी आंदोलन केले. त्यामुळे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंधरवड्यापूूर्वी सर्वेक्षण थांबविण्याची सूचना केली. त्यांनी शेतकर्यांना आठवडाभरात त्यांची मागणी देण्यास सांगितले होते. त्याचवेळी राज्य सरकारतर्फे पंधरा दिवसांत भूसंपादनाच्या मोबदल्याचा प्रस्ताव देण्यात येईल, असेही स्पष्ट केले होते. शेतकर्यांच्या तसेच राज्य सरकारने अद्याप कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. (Latest Pune News)
प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1962 च्या कलम 32 (2) ची अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार उदाचीवाडी आणि मुंजवडी या गावांतील जमिनीच्या सातबार्यावर ‘विमानतळासाठी संपादित’ असे शिक्के मारले आहेत.
तर वनपुरी, कुंभारवळण, एखतपूर, खानवडी आणि पारगाव या गावांतील सातबारा उतार्यावर दोन दिवसांत शिक्के मारण्यात येणार आहे. तसेच, यासंदर्भात शेतकर्यांच्या काही हरकती-सूचना असतील तर त्या लेखी स्वरूपात नोंदविण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. आलेल्या हरकतींवर संबंधित भूसंपादन अधिकारी सुनावणी घेऊन शेतकर्यांचे म्हणणे ऐकणार आहे.
वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण आणि पारगाव या गावांतील शेतकर्यांना दि. 29 मेपर्यंत हरकती नोंदविता येणार आहे. तर एखतपूर, खानवडी आणि मुंजवडी या गावांतील शेतकर्यांना दि. 25 मेपर्यंत हरकती नोंदविता येणार आहेत. यानंतर भूसंपादनाची पुढील प्रक्रिया पार पडणार आहे.
सर्वाधिक क्षेत्र पारगावमधील संपादित केले जाणार
पुरंदर विमानतळासाठी या सात गावांपैकी सर्वाधिक क्षेत्र हे पारगावमधील संपादित होणार आहे. या गावांतील 1 हजार 542 सर्व्हे नंबरमधील 972 हेक्टर जागा संपादित होणार आहे. त्याखालोखाल खानवडी गावातील 381 सर्व्हे नंबरमधील 451 हेक्टर जागा, कुंभारवळणमधील 424 सर्व्हे नंबर बाधित होत असून, या गावांतील 341 हेक्टर क्षेत्राचे संपादन होणार आहे.
वनपुरी गावातील 362 सर्व्हे नंबर बाधित होत असून, त्यातील 330 हेक्टर जमीन, उदाचीवाडी येथील 199 सर्व्हे नंबरमधील 240 हेक्टर जमीन, एखतपूरमधील 145 सर्व्हे नंबर बाधित होत असून, त्यातील 214 हेक्टर आणि मुंजवडीमधील 221 सर्व्हे नंबरमधील 122 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.