

नवी सांगवी : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या वतीने नवी सांगवी येथील फेमस चौकाचे मार्च महिन्यात सुशोभीकरण करण्यात आले होते. चौकाच्या मध्यभागी गोलाकार आकाराचे आकर्षक असे दिशादर्शक होकायंत्राचे नक्षीकाम करण्यात आले होते. मात्र नऊ महिन्यांतच हे नक्षीकाम गायब झाल्याचे पहावयास मिळत आहे. महापालिकेच्या 'ह' क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत स्थापत्य विभागाकडून चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले होते. स्मार्ट सिटीकडून पिंपळे गुरव परिसरात सुशोभीकरण करण्यात आलेल्या चौकापेक्षा अधिक देखणा, असा चौक नवी सांगवीमधील फेमस चौकाचे महापालिकेकडून सुशोभीकरण करण्यात आले होते.
चौकात मध्यभागी गडद अशा लाल, पिवळ्या रंगाचा वापर करून चारही बाजूच्या दिशा दर्शविण्याचे आकर्षक असे काम करण्यात आले होते. त्यामुळे चौकात ये-जा करणार्या नागरिकांना, वाहनचालकांना हा गोलाकार दिशादर्शक होकायंत्र आकर्षित करीत होता.
येथील चौकात येताच शाळकरी मुलांना, नागरिकांना, वाहनचालकांना पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर दिशादर्शक होकायंत्र ठळक अक्षरात डोळ्यांना दिसून येत होते. मात्र, काही महिने होताच चौकातील नजरेस पडणारे दिशादर्शक होकायंत्र गायब झाल्याचे पहावयास मिळत आहे. नवी सांगवीतील माहेश्वरी चौक, कृष्णा चौक, साई चौक, क्रांती चौक आदी चौकांपेक्षा देखणा, असा आकर्षक चौक अत्यंत कमी कालावधीत सुशोभीकरण करण्यात आला होता.
या वेळी परिसरातील नागरिकांनी, वाहनचालकांनी, छोटे मोठे व्यावसायिक, व्यापारीवर्ग यांनी महापालिकेच्या अधिकार्यांचे, कर्मचार्यांचे कौतुक व अभिनंदनही केले होते. मात्र, गेली काही महिने लाखो रुपये खर्च करून सुशोभीकरण करण्यात आलेल्या चौकाकडे महापालिकेचे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. संबंधित अधिकार्यांनी याकडे दुर्लक्ष न करता येथील चौकातील दिशादर्शक होकायंत्राचे गडद रंगकाम करून पुन्हा हा चौक आकर्षक करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
हे काम स्टॅम्प काँक्रीटीकरण मध्ये केले आहे. यावर आकर्षण रंगकाम करून घेतले होते. यासाठी स्पेसिफिक वेगळे रंग वापरण्यात आले होते. हे रंग चमकतात आणि टिकाऊ देखील आहेत. वाहतुकीमुळे तसेच पावसाळ्यामुळे ते पुसट झाले आहे. लवकरात लवकर ते पेंट करून घेण्यात येईल.
– विजय कांबळे, कनिष्ठ अभियंता स्थापत्य विभागसुबक असा चौक सुशोभीकरण केला होता. सकाळी मुलांना शाळेत सोडण्यासाठी जात असताना मुलांना दिशादर्शक चित्र पाहून आनंद होत होता. मुले त्वरित दिशा ओळखत होती. मात्र, दिशादर्शक होकायंत्र पुसट झाल्याने याकडे मुलांचे दुर्लक्ष होत आहे. तरी प्रशासनाने पुन्हा हे चित्र पेंट करून चौक आकर्षित करावा.
– सागर झगडे, स्थानिक नागरिक