पिंपरी : पुरुषांमध्ये स्त्री पात्र रंगविण्याची क्रेज

पिंपरी : पुरुषांमध्ये स्त्री पात्र रंगविण्याची क्रेज
Published on
Updated on

वर्षा कांबळे

पिंपरी : एखाद्या पुरुषाने थोडेसे बायकी हावभाव केले, तर त्याची लगेच चेष्टा केली जाते. पुरुष कलाकार जेव्हा स्त्री पात्र साकारण्यासाठी स्टेजवर येतात, तेव्हा नेहमी हसण्याचा विषय बनतात. स्त्री पात्र रंगवताना तसे अनेक बरेवाईट अनुभव येत असतात. पण तरीदेखील पुरुषांमध्ये स्त्री पात्र रंगविण्याची क्रेज वाढत आहे. सध्या पुरुष कलावंत खूप सुंदर लावणी सादर करत आहेत.

पूर्वी गावजत्रांमध्ये जुन्या परंपरेनुसार महिलांना काही बंधने होती, तर काही ठिकाणी ग्रामदेवतांच्या कार्यक्रमात महिलांना काम करण्याची परवानगी नव्हती. आजही काही ठिकाणी अशा प्रथा कायम आहेत.

नृत्य स्पर्धांमधून सहभाग
लोकांना अजूनही असेच वाटते की, लावणी ही महिलांनीच सादर केली पाहिजे. त्यामुळे बरेच लोक पुरुष कलावंतांना कार्यक्रमांना बोलावत नाहीत. अशावेळी जिथे कुठे नृत्याचे कार्यक्रम किंवा स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्याठिकाणी आवर्जून ही पुरुष मंडळी लावणी सादर करायला जातात. यातील काहींनी तर बक्षिसेही मिळविली आहेत. बर्‍याच कार्यक्रमांत प्रेक्षकांना माहीतच नसते की, लावणी सादर करणारे महिला आहेत की, पुरुष.

चांगले- वाईट अनुभव
लावणी सादर करताना चांगले- वाईट अनुभव येतात. एखादा पुरुष डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत महिलांच्या वेशभूषेत असल्यानंतर काही लोक वेगळ्या नजरेने पाहतात. पण, त्याकडे लक्ष दिले जात नाही.

कला हेच जीवन
गेले सतरा वर्षांपासून स्त्री पात्र साकारत आहे. मला लहानपणापासून आवड होती. लहानपणी गावी भारुडे असायची. त्यामध्ये पुरुषच स्त्री पात्र करतात. मग, मीदेखील करू लागलो. मी नृत्य आणि वगनाट्य यातून स्त्रीपात्र रेखाटतो. वेडी झाले पतीसाठी, नाती तुटली पैशांसाठी, सख्खा भाऊ पक्का वैरी, अशा काही नाटकांत स्त्री पात्र करतो. समाज नावे ठेवतो, पण कला हेच जीवन आहे. रसिकांची सेवा आहे.

                                                                -उमेश मुळशीकर

स्त्री पात्राला खूप सारी बक्षिसे
मला शाळेपासून अभिनयाची व नृत्याची आवड होती. काही दिवसांनी स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागलो. पण त्यामध्ये स्त्री कलाकारांना जास्त बक्षिसे मिळायची, मग मला माझ्या आईने स्त्री पात्र करायला लावले आणि मी ते सादर करू लागलो.

                                                                -डेनिस राऊत

प्रेक्षकांची दाद महत्त्वाची
मी पुरुष असून स्त्री पात्र करताना जो आनंद मिळतो, तो कुठेच मिळू शकत नाही. जेव्हा मी स्त्री पात्र साकारतो तेव्हा मला फार वेगळे वाटते. प्रेक्षकांची दाद महत्त्वाची असते. पुरुषांनी स्त्रीपात्र करणे फार कठीण आहे.

                                                             -संगम गोवर्धन

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news