मुळशीतील भात उत्पादक मेटाकुटीला उत्पादन खर्च गेला आवाक्याबाहेर
पौड : पुढारी वृत्तसेवा : एकेकाळी भाताचे आगार म्हणून ओळख असलेल्या मुळशी तालुक्यातील भात शेती संकटात सापडली आहे. सध्याच्या वाढत्या महागाईत शेती करण्यासाठी लागणारी मजुरी व साधनांच्या किमतीत दिवसेंदिवस वाढ होत असून त्या तुलनेत भाताच्या किमती मात्र वाढत नसल्याने भात शेती तोट्यात आल्याने भात उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. भाताचे खाचर तयार करण्यापासून ते प्रत्यक्ष भात लागवड, कीड नियंत्रण, काढणी, मळणी आणि भात भरडून तो बाजारात आणण्यापर्यंतच्या प्रक्रियेत एक एकरसाठी सरासरी 40 हजार रुपयांचा खर्च येतो.
एक एकर खाचरातून जास्तीत आठ ते दहा क्विंटल तांदूळ शेतकर्याच्या पदरात पडतो. हा तांदूळ व्यापारी मंडळी शेतकर्याकडून 40 ते 45 रुपये किलोने विकत घेतात. किरकोळ बाजारात हा तांदूळ फार फार तर 50 ते 55 रुपये किलो विकला जातो. प्रत्येक शेतकर्याला असे किरकोळ खरेदी करणारे किती ग्राहक मिळतील हे सांगता येत नाही. त्यामुळे त्यातून शेतकर्याला 35 ते 40 हजार रुपये मिळतात. झालेला खर्च आणि येणारे उत्पन्न याच्या खर्चाचा मेळ घातला तर शेतकर्याच्या हाती काहीच शिल्लक राहत नाही. उलट यात त्यांना स्वत:चे श्रम मात्र फुकट घालावे लागतात. खर्च करूनही मध्येच येणार्या नैसर्गिक आपत्तीमुळे पीक हाती येईल की नाही याचीही खात्री नसते.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार मुळशीत भात लागवड योग्य क्षेत्र हे 8575 हेक्टर असून विविध कारणाने घट होऊन ते यावर्षी 7583.91 हेक्टर एवढे राहिले आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास मुळशीत वरचेवर भात क्षेत्र कमी होण्यास वेळ लागणार नाही. गावागावातून दरवळणारा इंद्रायणी व आंबेमोहराचा सुगंध लोप पावणार की काय अशी चिंता व्यक्त केली
जात आहे.
..केवळ शेती राखण्यासाठी
अशा परिस्थितीत मुळशीत काही शेतकरी केवळ जमीन राखली पाहिजे या भावनेने शेती करताहेत. अलीकडे तर अनेक शेतकर्यांनी शेती कसण्याकडे पाठ फिरविली तर काही शेतकरी कंटाळून जमीन विकत आहेत.

