पुरंदरचे वीटभट्टी व्यावसायिक अवकाळीने त्रस्त

पुरंदरचे वीटभट्टी व्यावसायिक अवकाळीने त्रस्त
Published on
Updated on

परिंचे : पुढारी वृत्तसेवा : काही दिवसांपासून पुरंदर तालुक्यात अवकाळी पावसाने कहर केल्याने शेतकर्‍यांचे जसे अतोनात नुकसान होत आहे त्याचप्रमाणे वीटभट्टी व्यावसायिकांचेही नुकसान होत आहे. बागायती शेतकरी धास्तावलेल्या आहे तसेच वीटभट्टी व्यावसायिकांचीही अवस्था अवकाळी पावसामुळे खूपच बिकट झाली आहे. वीट भाजणीसाठी लावलेल्या भट्टीत पावसाचे पाणी गेल्यास लाखोंचे नुकसान होण्याची भीती त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. उन्हाळ्यात वीटभट्टी व्यावसायिकांचा हंगाम असतो नोव्हेंबर ते मे या सात महिन्यांत विटा तयार करण्याचा हंगाम असतो.

या दिवसात जास्तीत जास्त विटा तयार करून पुढे पावसाळ्यात पुरवठा केला जातो. सकाळी तयार केलेली वीट दिवसभरात वाळत नाही. अशावेळी पाऊस झाल्याने त्याची पुन्हा माती होते. परिणामी, सर्व कष्ट वाया जातात. त्यामुळे या लहरी हवामानाचा व पर्जन्यदेवतेचा वीटभट्टी व्यावसायिकांवर कोप झाला की काय, असे वाटू लागत आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिकांची विटा झाकण्यासाठी खूपच मोठी तारांबळ उडत आहे. भाजणीसाठी लावलेली भट्टी ढगाळ वातावरणात प्लास्टिक कागदाने झाकली जाणे अशक्य होते. या वातावरणात वादळी वारा सुटला तर कागद सहज उडून जातो व भट्टीत पावसाचे पाणी शिरते.

शेतकर्‍याच्या शेतमालाचे नुकसान झाल्यास भरपाई मिळते, परंतु वीटभट्टीसारख्या लघुउद्योजकांना हे अस्मानी संकट आले तर कर्जात बुडण्याशिवाय पर्याय नसतो. वीटभट्टी चालवणे जिकिरीचे काम आहे. मजुरांचा प्रश्न कायमचा भेडसावत असतो. परराज्यातील अनेक मजूर उचल पैसे देऊन आणले जातात,परंतु तेही रात्री-अपरात्री पळून जाण्याची शक्यता असते व पुन्हा त्यांना त्यांच्या राज्यामध्ये जाऊन आणणे म्हणजे एक तारेवरची कसरतच असते. वीटभट्टीचे काम अतिशय किचकट व कष्टदायक असल्याने येथील मजूर काम करण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे आम्हाला परराज्यातील मजुरांचा आधार घ्यावा लागतो, असे वीर येथील वीटभट्टी व्यावसायिक संतोष धुमाळ यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news