पिंपरी : तिसरा डोळा झोपलाय ! कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटर गेल्या तीन महिन्यांपासून बंद

पिंपरी : तिसरा डोळा झोपलाय ! कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटर गेल्या तीन महिन्यांपासून बंद

मिलिंद कांबळे : 

पिंपरी : सुमारे 30 लाख लोकसंख्येच्या शहरावर 24 तास वॉच ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या इंटीग्रेटेड सिटी कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटर आणि ऑपरेशन सेंटर गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहे. कर्मचारीच नसल्याने येथील कामकाज ठप्प आाहे. त्यामुळे तब्बल 666 कोटी (सर्व बाबी मिळून) खर्च करून उभारलेल्या या सेंटरच्या कार्यक्षमतेबाबत स्मार्ट सिटी कंपनी व पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच, पोलिस विभाग उदासीन असल्याचे स्पष्ट होत आहे.

शहरात साडेतीन हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, भूमिगत ऑप्टीकल फायबर केबल नेटवर्किंगचे कामही पूर्ण झाले आहे. बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे केबल नेटवर्किंगशी जोडण्यात आले आहे. शहरातील 600 किलोमीटर अंतराचे केबल नेटवर्किंग व सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे जाळे उभारण्यात आले आहे. ही यंत्रणा निगडी येथील टिळक चौकातील संत तुकाराम व्यापारी संकुलातील स्मार्ट सिटीच्या कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटरशी जोडण्यात आली आहे. देशात प्रत्येक मेट्रोपोलिटन सिटीसाठी कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटर बंधनकारक आहे. त्यानुसार स्मार्ट सिटीअंतर्गत तब्बल 441 कोटी 23 लाख खर्च करून हे सेंटर बनविण्यात आले आहे.

पहिल्या टप्प्यात 'अ' क्षेत्रीय कार्यालय हद्दीवर 24 तास नियत्रंण व देखरेख ठेवण्यास सेंटरच्या माध्यमातून सुरूवात झाली. त्याची सुरूवात तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी ऑगस्ट 2022 ला केली. टप्पाटप्प्यात उर्वरित सात क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत सेंटरद्वारे 24 तास वॉच ठेवला जाईल, असे स्मार्ट सिटी कंपनीने घोषित केले होते. मात्र, पाच महिने झाले तरी, अद्याप सेंटर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेले नाही. सीसीटीव्ही व फायबर केबल नेटवर्किंग जोडणीचे काम अद्याप काही भागात अपूर्ण स्थितीत आहे. चौक व रस्त्यांवरील हे कॅमेरे अनेक महिन्यांपासून निव्वळ शोभेचे ठरत आहेत.

मूळ ठेकेदार व उपठेकेदार यांच्यात बिलावरून बिनसल्याने सेंटरचे कामकाज तब्बल 3 महिने बंद होते. कर्मचारीच नसल्याने सेंटर ओस पडले होते. स्मार्ट सिटीचे सुदैव की, या काळात शहरात कोणतीही अनुचित घटना किंवा नैसर्गिक आपत्तीची घटना घडली नाही. शहराच्या सुरक्षेसाठी असलेले सेंटर 24 तास कार्यान्वित न ठेवता ते ठेकेदारांमुळे बंद ठेवले जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. हे सेंटर 100 टक्के कार्यान्वित झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयास वर्ग करण्यात येणार आहे. कामाची मुदत संपल्यानंतरही सुरू असलेल्या या सेंटरच्या कामकाजाबाबत पोलिस विभागही उदासीन असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संपूर्ण शहरावर 24 तास वॉच ठेवून शहर सुरक्षित ठेवण्याच्या उद्देश असफल ठरल्याचे स्पष्ट होत आहे.

निविदा आंतरराष्ट्रीय दर्जाची, काम गल्लीतील ठेकेदारांकडून

पिंपरी-चिंचवड शहराचे कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटरची 441 कोटीची निविदा देशपातळीवर प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय व नामवंत कंपन्यांनी निविदेस प्रतिसाद दिला. मात्र, हे काम स्वत: त्या कंपन्यांनी न करता त्यासाठी उपठेकेदार नेमले. उपठेकेदारांनी गल्ली-बोळातील कामांसाठी स्थानिक ठेकेदार नेमले. माजी नगरसेवक व पदाधिकारी, नेतेमंडळींनी आपले नातेवाईक व मर्जीतील स्थानिक ठेकेदारांकडून ते काम करून घेतले. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय निविदेचे प्रत्यक्षात काम गल्ली ठेकेदारांमार्फत झाले. या प्रकारासह कामाच्या सुमार दर्जावरून विरोधकांसह सत्ताधार्‍यांनी स्मार्ट सिटीच्या कारभारावर शंका उपस्थित करत गंभीर आरोप केले आहेत. मुदतीत काम न झाल्याने, वारंवार मुदतवाढ देऊनही हे काम अद्याप अपूर्ण स्थितीत आहे. लवकरच 100 टक्के क्षमतेने सेंटर सुरू होईल, असे अधिकारी सांगत आहेत.

शहरासाठी सेंटर महत्त्वाचा दुवा

स्मार्ट सिटीच्या पॅन सिटी अंतर्गत कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटर उभारण्यात आले. ते काम टेक महिंद्रा कंपनी करत आहे. त्यासाठी 441 कोटी 23 लाखांचा खर्च झाला आहे. तर, 50 किऑक्स, 55 व्हीएमडी, 270 वाय-फाय पोल, 690 स्मार्ट पोल, व इतर कामे लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो कंपनी करत आहे. त्यासाठी 225 कोटी खर्च झाला. असे एकूण तब्बल 666 कोटींपेक्षा अधिक खर्च करण्यात आला. कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी तसेच, वाहतूक रहदारी, दंगल, जमाव नियंत्रित करण्यासाठी सेंटरचा मोठा उपयोग होतो. पर्यावरण, घनकचरा व्यवस्थापन, वाहनतळ, पाणीपुरवठा, पीएमपी बस वाहतूक, महापालिकेचे कामकाज आदी कामे सेंटरमधून केली जाणार आहेत. शहराला वेगवान इंटरनेट सुविधा, वाय-फाय, किऑक्सची सुविधा या माध्यमातून मिळणार आहे. व्हीएमडीवर दररोज हवामान, प्रदूषणाची पातळी, पालिका व पोलिसांकडून दिल्या जाणार्‍या संदेश नागरिकांना दिसणार आहेत. तसेच, महापालिकेच्या विविध विभागाची तसेच, संपूर्ण शहराची सर्व माहिती या सेंटरमध्ये संग्रहित गेली जाणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठेकेदार पुढील पाच वर्षे देखभाल व दुरूस्तीही करणार आहे.

ठेकेदाराला दंड
काही तांत्रिक कारणांमुळे निगडी येथील कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटरचे कामकाज बंद होते. ते नुकतेच सुरू करण्यात आले आहे. लवकरच सेंटरचे 100 टक्के कामकाज सुरू करण्याचे नियोजन आहे. सेंटरचे कामकाज बंद ठेवल्याबद्दल संबंधित ठेकेदारांला दंड करण्यात आला आहे, असे स्मार्ट सिटीच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी निळकंठ पोमण यांनी दिली.

लाखोंचे वीज बिल अन् दुरुस्तीचाही भुर्दंड
कोट्यवधी रुपये खर्चून तयार केलेले हे सेंटर गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहे. संबंधित ठेकेदार व उपठेकेदार यांच्यात बिलावरून बिनसल्याने तेथील कर्मचारी काढून घेतल्याने या सेंटरचे कामकाज ठप्प आहे; मात्र, सेंटरचे दरमहिन्याचे लाखोंचे बिल तसेच, दुरुस्ती व देखभालीचा खर्च स्मार्ट सिटी कंपनीस करावा लागत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news