कसबा पेठ : शिवाजी पूल ते डेंगळे पुलाकडे (संताजी घोरपडे रस्ता) जाणार्या रस्त्यावरील नदीपात्रालगतचे संरक्षक कठडे पडून धोकादायक झाले आहेत. अनेक वर्षांपासून तुटलेल्या कठड्यांच्या पुलाच्या दुरुस्तीची वारंवार मागणी करूनही महापालिका अधिकारी किंवा कर्मचारी लक्ष देत नसून हेरिटेजच्या नावाखाली टाळाटाळ सुरू असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
वास्तविक शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शिवाजी पुलाकडून डेंगळे पुलाकडे जाणार्या रस्त्यावर कायम वर्दळ असते. केशवनगर, मुंढवा, सिंहगड रस्ता परिसरात जाण्यासाठी सहा बसथांबे या परिसरात आहेत. ऐतिहासिक शनिवारवाडा, शिवाजी पूल, महापालिका, मेट्रो स्टेशन, अनेक रुग्णालयेदेखील याच परिसरात आहेत. पावसाळ्यात या तुटलेल्या कठड्यांमुळे मोठी गैरसोय होऊ शकते.
याबाबत कसबा अग्निशामक केंद्राने अनेक वेळा बीट मार्शल यांना कॉल करून पावसाळ्यात धोका उद्भवू शकतो, त्यामुळे वेळेत बंदोबस्त करावा, असे सांगण्यात आले आहे. मात्र, अद्यापही या कठड्याची दुरुस्ती झाली नाही. कठड्यापासून नदीपात्राचे अंतर 20- 25 फूट असून या तुटलेल्या कठड्याजवळ अनेक नागरिक सकाळ किंवा रात्रीच्या वेळी कचरा नदीत टाकत असून नदीपात्रात कचर्याचे ढीग झाले आहेत. अनेक नागरिक नदीपात्रात कचरा टाकून जाळत असल्याचे पाहावयास मिळते.
संताजी घोरपडे पथावरील शिवाजी पुलालगतची सीमाभिंत अनेक ठिकाणी अनेक वर्षांपासून पडली आहे. महापालिकेचे कॉन्ट्रॅकवरील सफाई कर्मचारी या तुटलेल्या कठड्यावरून कचरा थेट नदीपात्रात टाकतात. त्यामुळे नदीत कचर्याचे ढीग झाले आहेत. वारंवार अग्निशमन, पालिका कर्मचारी यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली, मात्र व्यर्थ. गाडगीळ पूल ते डेंगळे पूल कठड्यांना जाळी बसवावी.
संजय पायगुडे, सरचिटणीस, भाजप पर्यावरण आघाडी