नाशिक : राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला धक्का देत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यांना नाशिक पूर्व मतदारसंघातून शरद पवार गटाची उमेदवारीही बहाल करण्यात आली आहे. त्यामुळे आता नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपचे आमदार ॲड. राहुल ढिकले व राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून गणेश गिते यांच्यात सरळ लढत होणार असून ही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता रंगात आली आहे. उमेदवारीसाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठी रस्सीखेच असून पक्षांतराचे वारे जोमाने वाहात आहेत. उमेदवारी देईल, तो पक्ष आपला या भावनेतून एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या घेण्याचे प्रकार सध्या जोमात सुरू आहेत. त्यातूनच नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपला खिंडार पडले आहे. सलग दोनवेळा स्थायी समितीचे सभापती राहिलेले गणेश गिते यांनी या मतदारसंघातून भाजपच्या ॲड. राहुल ढिकले यांना आव्हान दिले आहे. महापालिकेच्या २०१७ च्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मधून निवडून आलेले गिते २०२१ व २०२२ अशी सलग दोन वर्षे स्थायी समितीचे सभापती होते. मंत्री महाजन यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे.
भाजपकडून विद्यमान आमदार ॲड. ढिकले यांची उमेदवारी कापली जाणे कठीण असल्याचे लक्षात आल्यानंतर गिते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन 'तुतारी' फुंकण्याचा इशारा दिला होता. भाजपकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न झाले. परंतु गिते निवडणूक लढविण्यावर ठाम होते. अखेर शनिवारी (दि. 26) त्यांनी मुंबईत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. शरद पवार गटातर्फे नाशिक पूर्व मतदारसंघातून त्यांना उमेदवारीही बहाल करण्यात आली. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.
देवळाली मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाने माजी आमदार योगेश घोलप यांना उमेदवारी दिल्याने माजी मंत्री बबन घोलप यांनी शिवसेना शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत स्वगृती परतण्याचा निर्णय घेतला. पाठोपाठ गणेश गिते यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केल्याने महायुतीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. पूर्व मतदारसंघात आता गिते यांचा भाजपच्या ढिकलेंशी सामना होणार आहे. गिते यांच्यासारखा म्होरका हेरून शरद पवार गटाने गिरीश महाजन यांना चेकमेट दिल्याची चर्चा आहे.
भाजपने निराशा केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पवार यांनी आपल्यावर विश्वास टाकत नाशिक पूर्व मतदारसंघातून पक्षाची उमेदवारी दिली आहे. त्यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवणार.
गणेश गिते, स्थायी समितीचे माजी सभापती, नाशिक.