पुणे : विद्यापीठ चौक पुलाबाबत मुख्यमंत्री बैठक घेणार

पुणे : विद्यापीठ चौक पुलाबाबत मुख्यमंत्री बैठक घेणार
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोसोबतचा नियोजित उड्डाणपूल जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी मान्य केले. या पुलाच्या कामाचा सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मुख्यमंत्री यांना बैठक घेण्याची विनंती केली होती.

मुंबईमध्ये विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने शिरोळे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची त्यांच्या दालनात भेट घेतली आणि या नियोजित पुलासंदर्भात निवेदन दिले. विधानसभेत गेल्या पावसाळी अधिवेशनात शिरोळे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे विद्यापीठ चौकातील नियोजित पूल, तेथे वाहनचालकांना रोज होणारा त्रास यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्या वेळी, पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाची ( पुम्टा) बैठक घेण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार, बैठका झाल्या. मात्र, पुलाच्या कामाला अद्यापही वेग आलेला नाही.

ही माहिती शिरोळे यांनी निवेदनाद्वारे दिली. शिरोळे म्हणाले की, शिवाजीनगर मतदारसंघात हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे काम सुरू आहे. मेट्रोच्या उन्नत मार्गासोबतच तेथे दुमजली पूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यापीठ चौकातील जुना उड्डाणपूल पाडला. त्यामुळे आता विद्यापीठ चौकात नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा मांडल्यानंतर गेल्या सहा महिन्यांत मी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांच्या वारंवार बैठका घेतल्या. मात्र, वाहतूक कोंडीची समस्या सुटली नाही.

विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल बांधल्यानंतर येथील वाहतुकीची समस्या बहुतांश प्रमाणात सुटेल. हा पूल जानेवारी 2024 पर्यंत बांधून पूर्ण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्याची सूचना मी केली होती. मात्र, टाटा कंपनीने त्याबाबतचा अहवाल अद्याप दिलेला नाही. मुख्यमंत्री यांना भेटून ही सर्व वस्तुस्थिती सांगितली. त्यानंतर यासंदर्भात पुम्टा आणि अधिकार्‍यांची बैठक घेण्याची मी केलेली विनंती मुख्यमंत्री यांनी मान्य केली. ही बैठक लवकर घेण्यात येईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news