

गडी थेट पोलिसांच्या गाडी पुढेच आडवा
अनोख्या निषेधाने बघ्यांची गर्दी; मात्र पोलिस खाक्या दाखवत दंड वसुली
आळंदी : अवैध पार्किंगमध्ये दुचाकी उभी केली म्हणून पोलिसांनी दुचाकी उचलली. दंड भरण्याची मागणी केली, दुचाकी चालक तरुण थेट पोलिसांच्या गाडीपुढेच आडवा झाला. त्याच्या या अनोख्या निषेधाने पोलिसांना त्याला समजून सांगताना दमछाक तर झालीच मात्र रोजच्या कारवाईला वैतागलेल्या नागरिकांनी मात्र त्याच्या या कृत्याचे समर्थन करत पोलिसांच्या कारवाईत सुधारणा करण्याची मागणी केली. अधिकृत पर्यायी जागा द्या अन् खुशाल कारवाई करा अशी नागरिकांची मागणी आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तीर्थक्षेत्र आळंदी व देहूफाटा परिसरात अवैध पार्किंग केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कडक कारवाई सुरू आहे. अनेक वाहने टॉइंग व्हॅनद्वारे उचलून जप्त केली जात आहेत. मात्र, वाहन पार्किंगसाठी पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने आणि सम-विषम तारखांचे फलक नसल्याने नागरिकांपुढे वाहने कुठे लावायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गुरुवारी देहू फाट्याजवळील काळे कॉलनीसमोर वाहतूक पोलिसांनी अवैध पार्किंगविरोधी मोहीम राबवली. रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकी टोईग टॉइंग व्हॅनद्वारे उचलल्या जात होत्या. यावेळी एका दुचाकी मालकाने थेट टोईग व्हॅनसमोर रस्त्यावर आडवे झोपून निषेध नोंदवला. पोलिसांनी त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो उठण्यास तयार नव्हता. यामुळे काही वेळ पोलिस आणि त्याच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. हा प्रकार पाहण्यासाठी परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. अखेर पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवत नीट समजून सांगत त्याकडून दंड वसूल केलाच व त्याची दुचाकी परत केली.
याबाबत दिघी आळंदी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश नांदुरकर यांनी सांगितले की त्या व्यक्तीची मोटरसायकल नो- पार्किंग झोनमध्ये असल्याने टॉइंग कारवाई करण्यात आली. तो दंड भरण्यास तयार नव्हता आणि त्याने मद्यपान केले होते कारवाई टाळण्यासाठी तो टोईग व्हॅनसमोर रस्त्यावर झोपला. त्याला समजावल्यानतर त्याने दंड भरला आणि मोटरसायकल घेऊन गेला.