

Gaja Marane News:
पुणे : सुरक्षेच्या कारणास्तव गुंड गजा मारणे याची येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात रवानगी करत असताना मारणे याने ढाब्यावर मटण पार्टी केल्याचे सीसीटीव्हीतून समोर आले होते. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्तांनी बंदोबस्तावरील सहायक पोलिस निरीक्षकासह पाच पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली आहे. याखेरीज, ताफ्याचा पाठलाग करत मारणे यास ढाब्यावर भेटणार्या सराईतासह तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेतील सहायक पोलिस निरीक्षक सुरजकुमार यलप्पा राजगुरू, हवालदार महेश लक्ष्मण बामगुडे, हवालदार सचिन लक्ष्मण मेमाणे, रमेश ताऊजी मेमाणे व शिपाई राहुल मनोहर परदेशी अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मारणे यास सांगली येथे कारागृहात नेत असताना पोलिस बंदोबस्तावर सहायक पोलिस निरीक्षकासह चार पोलिस कर्मचारी होते. मारणेला सांगली कारागृहात नेत असल्याची माहिती त्याच्या साथीदारांना मिळाली होती. मारणेच्या व्हॅनच्या मागावर साथीदारांच्या मोटारींचा ताफा होता. पुणे-सातारा महामार्गावरील एका ढाब्यावर व्हॅन थांबविण्यात आली. बंदोबस्तात असलेल्या सहायक पोलिस निरीक्षकासह पाच पोलिस कर्मचार्यांनी ढाब्यावर जेवण केले.
त्याठिकाणी मारणेला मोटारीतून आलेल्या सतीश शिळीमकर, विशाल धुमाळ, बाळकृष्ण उर्फ पांड्या मोहिते यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी मारणेला बिर्याणी नेऊन दिली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यांनी टिपला होता. मारणेच्या मटण पार्टीची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना मिळाली. त्यानंतर याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी केली.
चैाकशीत दोषी आढळलेल्या सहायक निरीक्षकासह सहा जणांना निलंबित करण्याचे आदेश दिले, तसेच मारणेला ढाब्यावर भेटणारे साथीदार शिळीमकर, मोहिते, धुमाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.कोथरूड भागात श्री शिवजयंतीनिमित्त काढण्यात येणार्या मिरवणुकीत दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुणाला किरकोळ वादातून मारणे टोळीतील गुंडांनी मारहाण केल्याची घटना घडली. त्या वेळी मारणे मोटारीतून साथीदारांसोबत निघाला होता. याप्रकरणात मारणे याच्यासह साथीदारांना अटक करण्यात आली होती. मारणे आणि साथीदार येरवडा कारागृहात आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव मारणेला सांगली येथील कारागृहात नेण्यात येत होतेर्.ें
मारणेविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. कोथरुड भागात संगणक अभियंत्याला मारहाण केल्याप्रकरणी मारणेसह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी मारणेला अटक करण्यात आली होती. मारणे शक्यतो येरवडा कारागृहात राहत नाही. गंभीर गुन्ह्यात अटक केल्यानंतर मारणे राज्यातील अन्य कारागृहात राहण्यास पसंती देतो, ही बाब पोलिस आयुक्तांना समजली होती. त्यामुळे मारणेला सांगली कारागृहातून पुन्हा येरवडा कारागृहात हलविण्यात आले.