बारामती बसस्थानकाची इमारत येतेय आकाराला

बारामती बसस्थानकाची इमारत येतेय आकाराला

बारामती; पुढारी वृत्तसेवा: बारामती बसस्थानकाची नूतन इमारत सध्या आकाराला येत आहे. तालुकापातळीवरील राज्यातील हे सर्वांत मोठे पंचतारांकित बसस्थानक असून, लवकरच ते प्रवाशांच्या सेवेत येईल. एखाद्या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या कॉर्पोरेट कार्यालयाप्रमाणे या बसस्थानकाची रचना आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या संकल्पनेतून ते आकाराला येत आहे. राज्यासह परराज्यातील एसटी महामंडळासाठी रोल मॉडेल ठरावे असे हे बसस्थानक आहे. त्यामुळे बारामती शहराच्या वैभवात मोठी भर पडणार आहे.

या इमारतीचे काम सुरू असल्याने सध्या बसस्थानक तात्पुरत्या स्वरूपात कसब्यात स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत असले, तरी भविष्यात त्यांच्यासाठी सर्व सुखसोयींनी युक्त स्थानक सेवेत येणार आहे. बसस्थानकाच्या इमारतीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. विकासकामे करताना दुरदृष्टी ठेवून ती बारामतीत केली जातात. बारामती बसस्थानकाबाबतीतही हा अनुभव नागरिकांना येत आहे.

छोट्या विमानतळाच्या धर्तीवर हे बसस्थानक असेल. तेथे सर्व सोयीसुविधा उपलब्ध असणार आहेत. आधुनिक झिंग रुफिंक स्ट्रक्चरमध्ये बसस्थानकाच्या छताचे काम होणार आहे. दर्शनी भाग हा ब्रिक क्लॅडिंग प्रकारातील आहे. जवळपास दोन लाख स्क्वेअर फुटांची ही प्रशस्त इमारत होणार आहे.

  • दृष्टिक्षेपात बसस्थानक
  • एका वेळेस 22 बस फलाटावर थांबण्याची सुविधा
  • 24 हजार स्क्वेअर फुटांचे प्रशस्त फलाट
  •  एकावेळी 56 बस पार्किंगची व्यवस्था
  •  बस व प्रवाशांसाठी स्वतंत्र आत आणि बाहेर जाण्याची व्यवस्था
  •  प्रवाशांसाठी स्वतंत्र पार्किंग
  • बसस्थानकाशेजारी आधुनिक बस डेपो
  • प्रवाशांसाठी प्रशस्त बैठकव्यवस्था
  • अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी वातानुकूलित प्रतीक्षागृह
  • हिरकणी कक्ष
  • बसस्थानकासाठी 8 दुकाने
  • वाहनचालक, वाहकांसाठी आराम कक्ष
  • प्रशस्त कॅन्टीन व किचन, ओपन कोर्ट यार्डमध्ये बसण्याची सोय
  • तळमजल्यावर 22 दुकाने, पहिल्या मजल्यावर 22 कार्यालये
  • पहिल्या मजल्यावर परिवहन महामंडळासाठी कॉन्फरन्स हॉल
  •  सेमिनार हॉल व बँकेची सुविधा
  • पहिल्या मजल्यावर एसटीच्या अधिकार्‍यांसाठी दोन व्हीआयपी सूट

बारामती बसस्थानक आंतरराष्ट्रीय दर्जाचे असावे, ही विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भूमिका होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्णत्वाला जात आहे. लवकरच भव्यदिव्य बसस्थानक जनतेच्या सेवेत येईल. विकासकामांसाठी इच्छाशक्ती लागते. ती इथल्या नेतृत्वात असल्यानेच दर्जेदार कामे येथे होत आहेत.
                                                                सचिन सातव, अध्यक्ष,
                                                              बारामती सहकारी बँक

बारामतीतील हे बसस्थानक महामंडळाच्या इतिहासात सर्वांत वेगळे,आकर्षक व भव्यदिव्य असे आहे. त्याचे काम सध्या गतीने सुरू आहे. जानेवारीअखेरपर्यंत ते प्रवाशांच्या सेवेत यावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
                                                                   रमाकांत गायकवाड,
                                                             एसटी विभाग नियंत्रक, पुणे

अधिकारी-कर्मचारी निवासस्थाने
आगार व्यवस्थापक 2 निवासस्थाने
कर्मचारी निवासस्थाने
वन बीएचके – 23,
टू बीएचके – 6

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news