बिल्डरपुत्राचे रक्ताचे नमुने बदलले; ससूनच्या 2 डॉक्टरांसह तिघांना बेड्या

बिल्डरपुत्राचे रक्ताचे नमुने बदलले; ससूनच्या 2 डॉक्टरांसह तिघांना बेड्या

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने कचर्‍यात फेकून दुसर्‍याच व्यक्तीच्या व्यक्तीच्या रक्ताच्या नमुन्याचा चाचणी अहवाल दिल्या प्रकरणी पोलिसांनी ससून रुग्णालयातील दोघा डॉक्टरांसह तिघांना अटक केली. न्याय वैद्यकशास्त्र विभागाचे (फॉरेन्सिक डिपार्टमेंट) प्रमुख डॉ. अजय अनिरुद्ध तावरे (वय 38, रा. गीता सोसायटी, कॅम्प, पुणे), प्रथमोपचार विभागाचे प्रमुख डॉ. श्रीहरी भीमराव हाळनोर (वय 35, रा. बी. जे. मुलांचे वसतिगृह, मूळ रा. भूम, धाराशिव), आणि शवविच्छेदन विभागातील शिपाई अतुल नामदेव घटकांबळे (वय 30, रा. सुंदरनगरी सोसायटी, सोमवार पेठ, पुणे) अशी त्यांची नावे आहेत. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. पांडे यांनी या तिघांनाही चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

डॉ. तावरे आणि डॉ. हाळनोर यांना पोलिसांनी रविवारी (दि. 26) सायंकाळी सातच्या सुमारास चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीअंती त्यांना सोमवारी (दि. 27) पहाटे पाच वाजता अटक केली, तर घटकांबळे याला दुपारी सव्वादोनच्या सुमारास बेड्या ठोकल्या. अपघातप्रकरणी अकिब मुल्ला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, येरवडा पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलावर भादंवि कलम 304, 279, 338, 337, 427 मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे. आता या गुन्ह्यात 213, 214, 201, 120 (ब) या कलमांची वाढ करून तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरणात यापूर्वी ससूनमधील काही डॉक्टरांना पोलिसांनी अटक केली होती.

कल्याणीनगर भागात 19 मे रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास भरधाव पोर्शे कारने दुचाकीला धडक दिली होती. त्यामध्ये संगणक अभियंता अनिश अवधिया आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला होता. अल्पवयीन मुलगा अपघातापूर्वी दोन पबमध्ये गेला होता आणि त्याने मद्यपान केले होते. दरम्यान, अपघात झाल्यानंतर पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले. त्या वेळी त्याने मद्य प्राशन केल्याचे समोर आले. रविवारी (दि. 19) सकाळी वैद्यकीय तपासणीसाठी त्याला ससून रुग्णालयात नेण्यात आले होते. त्या वेळी हाळनोर हे प्रथमोपचार (कॅज्युअल्टी मेडिसीन डिपार्टमेंट) विभागात कर्तव्यावर होते. हाळनोर याने मुलाच्या रक्ताचे नमुने वैद्यकीय चाचणीसाठी घेतले. हे रक्ताचे नमुने लॅबला पाठवण्यात येणार होते. त्यामुळे या गुन्ह्यात हे रक्ताचे नमुने महत्वाचे होते. मात्र डॉ. तावरेच्या सांगण्यावरून अल्पवयीन मुलाच्या नमुन्या ऐवजी दुसर्‍याच व्यक्तीच्या रक्ताच्या नमुन्यांची चाचणी घेण्यात आली.

डॉ. हाळनोर याने घटनेच्या पहिल्या दिवशी अल्पवयीन मुलाचा फिजिकल रिपोर्ट निगेटिव्ह दिला होता. त्यामुळे पुणे पोलिस बुचकळ्यात पडले. अशा प्रकरणात आरोपीचा फिजिकल रिपोर्ट थेट निगेटिव्ह येत नाही तर शक्यता आहे असा येतो. यामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना यामध्ये काहीतरी गडबड झाल्याचा अंदाज आला होता. त्यामुळे त्यांनी मुलाच्या रक्ताचे नमुने हे ससून बरोबरच औंध येथील जिल्हा रुग्णालयात परिक्षणासाठी पाठवले होते. एकाच रक्ताचे दोन वेगवेगळे अहवाल जेव्हा प्राप्त झाले तेव्हा मुलाच्या वडिलांची डीएनए चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ससूनमधून आलेल्या रक्त चाचणीचा अहवाल जुळला नाही. तर औंध येथील रक्ताचे सॅम्पल हे अल्पवयीन मुलगा आणि वडिलांचा जुळून आला.

त्यामुळे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी डॉ.तावरे आणि हाळनोर या दोघांना ताब्यात घेतले. सुरुवातीला दोघांनी तो मी नव्हेचची भूमिका घेतली. मात्र शेवटी पोलिसांनी हाळनोर याला बोलते केले असता, त्याने मुलाच्या रक्ताचे नमूने बदलल्याचे कबुल केले. त्यासाठी त्याला तीन लाख रुपये मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र तावरे याने किती पैसे घेतले हे समजले नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तर शिपाई घटकांबळे मार्फत पैशाचा व्यवहार झाला असल्यामुळे त्याला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलिसांनी ससून मधील सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.

घटकांबळेच्या ताब्यातील रोकड शेजार्‍याकडून जप्त..

या प्रकरणात मध्यस्थीची भूमिका बजावणारा अतुल घटकांबळे याच्या घराची गुन्हे शाखेने झाडाझडती घेतली. यावेळी त्याने या प्रकरणात मिळालेले अडीच लाख रुपये शेजारी राहणार्‍या व्यक्तीच्या घरात ठेवले होते.

बिल्डरपुत्रासाठी रक्त देणारा पोलिसांच्या रडारवर

बिल्डरपुत्राच्या रक्ताच्या नमुन्याऐवजी तिर्‍हाईत व्यक्तीच्या रक्ताचा नमुना आरोपींनी घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्याचा शोध घेण्यासह गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी करण्यात आल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. पांडे यांनी ती मान्य करत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड. नीलेश लडकत व अ‍ॅड. योगेश कदम यांनी, तर बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. सुधीर शहा, अ‍ॅड. ऋषिकेश गानू, अ‍ॅड. विपुल दुशिंग यांनी काम पाहिले.

अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदललल्याप्रकरणी, ससूनमधील डॉ. तावरे आणि हाळनोर या दोघांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. हाळनोर याने मुलाचे रक्ताच्या चाचणीसाठी घेतले होते. त्यानेच ते सील केले. त्यानंतर ते कचर्‍यात फेकून दिले. आत्तापर्यंत अपघात प्रकरणाच्या अनुषंगाने पोलिसांनी तीन गुन्हे दाखल केले आहेत. जो कोणी या प्रकरणात सहभागी असेल, त्याला सोडले जाणार नाही.

अमितेश कुमार, पोलिस आयुक्त पुणे शहर

ससूनमधील प्रकरणाबाबत त्रिसदस्यीय समिती स्थापन

ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी बिल्डरपुत्राच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये केलेल्या फेरफारप्रकरणी वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांच्या सहीने पत्र काढण्यात आले आहे. समितीतील सदस्य आज मंगळवारी (दि. 28) ससून रुग्णालयात येऊन चौकशी करणार आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news