धक्कादायक! विवाह सोळाव्याच्या मंडपातच ठेवावा लागला वराचा मृतदेह

धक्कादायक! विवाह सोळाव्याच्या मंडपातच ठेवावा लागला वराचा मृतदेह
Published on
Updated on

शिवनगर/माळेगाव; पुढारी वृत्तसेवा : आपल्या जीवनात 16 मंगल कार्य असतात. त्या 16 मंगल कार्यांपैकी एक मंगल कार्य म्हणजे विवाह सोहळा. असाच विवाह सोहळा माळेगाव (ता. बारामती) येथील अनिल येळे यांच्या कुटुंबात मोठ्या थाटामाटात साजरा झाला. परंतु येळे परिवारातील या विवाह सोहळ्याचा आनंद फार काळ टिकला नाही. कारण ज्याचा थाटामाटात विवाह झाला त्या नवरदेव सचिनचे लग्नानंतर सहाव्या दिवशी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यामुळे येळे परिवारावर काळाने घाला घातला. लग्नाचा सोळावा आणि सत्यनारायणाच्या पूजेनिमित्ताने उभारलेल्या मंडपातच नवरदेवाचा मृतदेह ठेवण्याची वेळ येळे कुटुंबावर आली.

माळेगाव कारखान्याचे निवृत्त कर्मचारी अनिल पांडुरंग येळे यांचा मुलगा बबलू ऊर्फ सचिन अनिल येळे (वय 25) याचा विवाह परभणी येथील खंडोजी संतोबा बोरकर यांची मुलगी हर्षदा हिच्याशी शनिवारी (दि. 19) मोठ्या थाटामाटात शारदानगर येथील एका मंगल कार्यालयात झाला. लग्नानंतर रितीरिवाजानुसार हे नव वधू-वर दाम्पत्य रविवारी आणि सोमवारी कुटुंबीयांसमवेत देवदर्शन घेऊन आले, तर मंगळवारी लग्नाचा सोळावा आणि सत्यनारायणाची पूजादेखील आप्तेष्टांच्या उपस्थितीत पार पडली.

पूजेच्या दुसर्‍याच दिवशी म्हणजे बुधवारी रात्री सचिन याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. नातेवाईकांनी तातडीने त्याला वैद्यकीय उपचारासाठी बारामती शहरात आणले, परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच सचिनची प्राणज्योत मावळल्याचे सांगितले. त्यानुसार सचिनच्या निधनाची बातमी गुरुवारी पहाटे वार्‍यासारखी सर्वत्र पसरली. नातेवाइकांसह मित्र परिवार आणि माळेगाव परिसरातील ग्रामस्थांना एकच धक्का बसून सर्वत्र शोककळा पसरली. दरम्यान मृत सचिनच्या अंत्यविधीला नातेवाइकांसह माळेगावकरांनी मोठी गर्दी केली होती.

नववधू हर्षदाच्या स्वप्नांचा चक्काचूर
परभणी येथील हर्षदाने संसाररुपी आयुष्याची सुरुवात करताना किती स्वप्ने उराशी बाळगली असतील; मात्र पतीच्या अचानक जाण्याने नववधूचा नेसलेला शालू, हातात घातलेला चुडा, काढलेली मेहंदी आणि हळदीचे अंग अशा अवस्थेत असलेल्या हर्षदाच्या स्वप्नांचा मात्र चक्काचूर झाला.

आई-वडील, नववधूचा आक्रोश हृदय हेलावणारा
अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीने परभणी येथील नववधू हर्षदा हिची मानसिकता आणि सुन्न झालेले मन पाहवत नव्हते, तर सचिनच्या आई-वडिलांचा तसेच नातेवाइकांचा आक्रोश सर्वांचे हृदय हेलावून टाकणारा होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news