

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : चिंचवडगाव येथील क्रांतितीर्थ (चापेकर वाडा) येथे सध्या क्रांतिवीर चापेकर बंधू यांच्या जीवनातील 20 ते 22 प्रसंग हे तैलचित्र आणि पुतळ्यांच्या माध्यमातून साकारण्याचे काम सुरू आहे. हे काम जून महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सध्या या कामासाठी चापेकर वाडा बंद ठेवण्यात आला आहे. दामोदर हरी चापेकर, बाळकृष्ण हरी चापेकर आणि वासुदेव हरी चापेकर यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. चापेकर बंधू यांच्या बलिदानाची आठवण आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या जीवनातील 20 ते 22 प्रसंग माहिती आणि डिजिटल स्वरुपात चापेकर वाड्यात उभारण्यात येत आहेत. त्यासाठी एकूण 50 पुतळे करण्यात येत आहे. त्याशिवाय, क्रांतिकारकांची तैलचित्रे बनविण्याचे काम सुरू आहे.
क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे याबाबत आधिक माहिती देताना म्हणाले की, चापेकर बंधूंचे स्वयंपाकघर, देवघर (घरातील मंदिर) यांची प्रतिकृती वाड्यात करण्यात येत आहे. त्याशिवाय, त्यांच्या जीवनातील 20 ते 22 प्रसंग पुतळे आणि तैलचित्रांच्या माध्यमातून चितारले जात आहे. डिसेंबर 2022 पासून या कामाला सुरुवात झाली आहे.
या कामासाठी सध्या चापेकर वाडा बंद ठेवण्यात आला आहे. जून महिन्यापर्यंत हे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर चापेकर वाडा खुला करण्यात येईल.
क्रांतितीर्थाच्या विस्ताराला दोन वर्ष लागणार
क्रांतितीर्थ (चापेकर वाडा) या चापेकर बंधूंच्या स्मारकाचा विस्तार करण्यात येणार आहे. त्यामध्ये बहुउद्देशीय सभागृह, प्रदर्शन हॉल, ऐतिहासिक वस्तूंच्या संग्रहालयाचा हॉल, कॉन्फरन्स हॉल, जिम्नॅशियम हॉल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी 30 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे.
चापेकर बंधूंचे स्मारक (चापेकर वाडा) विस्तारीकरणाच्या कामासाठी सध्या निविदा प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काम सुरू करण्यात येईल. सध्या विस्तारीकरणाचे काम सुरू करण्यात आलेले नाही.
-अनिल शिंदे, कार्यकारी अभियंता, महापालिका